पुरोगामी रामगिरी
   दिनांक :21-Apr-2019
 अभिमानस्थळ
 - डॉ. रमा गोळवलकर
 
पुरोगामी याचा शब्दश: अर्थ आहे पुढे जाणारी/रा. आज जरी या शब्दावर मळभ दाटलं असलं, तरी काळाच्या पुढे जाऊन विचार करून ते कृतीत उतरवत इतरांकरता नवा आदर्श निर्माण करणारी व्यक्ती पुरोगामी म्हणवली जाते. हे पुरोगामित्व महाराष्ट्राच्या मातीत आहे, यात शंका नाही. इसवीसनपूर्व पहिल्या शतकात जिच्या नावाचं नाणं टांकलं गेलं ती सातवाहन साम्राज्ञी नागणिका याच महाराष्ट्रातली. तिच्यानंतर जवळपास चारशे वर्षांनंतर याच महाराष्ट्राच्या भूमीत एक अशी राजमाता झाली जिची राजमुद्रा या भूमीत 20 वर्षं तळपत होती.
 

 
 
गुप्त साम्राज्याचा राजा चंद्रगुप्त प्रथमची पणती, महाप्रतापी सम्राट समुद्रगुप्ताची नात आणि महापराक्रमी राजा चंद्रगुप्त (द्वितीय, राज्यकाळ साधारणत: इसवीसन 375 ते 415) आणि कुबेरनागाची मुलगी प्रभावतीगुप्ताचा विवाह नंदिवर्धनचे युवराज रुद्रसेनाशी इसवीसन 380 च्या दरम्यान झाला. वाकाटक राजघराणं जरी शैव असलं तरी युवराज्ञी प्रभावतीगुप्ताच्या माहेरी विष्णुभक्ती रुजली होती. नंदिवर्धनच्या जवळच असलेल्या रामगिरीवर स्थापित श्रीरामाच्या पादुकांचं पूजन ती करत असे. नंतर वाकाटकसम्राट झालेल्या रुद्रसेनानेही वैष्णव मत स्वीकारलं. दरम्यान साम्राज्ञी प्रभावतीगुप्ता दोन राजकुमारांची माता झाली होती. मोठा दिवाकरसेन 5 वर्षांचा तर लहाना दामोदरसेन केवळ 2 वर्षांचा होता त्या वेळी म्हणजे इ.स. 390 मधे रुद्रसेनाचा मृत्यू झाला.
 
प्रभावतीगुप्तानं अल्पवयीन दिवाकरसेनाला गादीवर बसवलं आणि राजमाता म्हणून राज्यकारभार सांभाळायला सुरुवात केली. त्या वेळी तिच्या पित्यानं म्हणजे सम्राट चंद्रगुप्त (द्वितीय)नं तिच्या मदतीला आपल्या दरबारीची काही अत्यंत विश्वासू आणि कर्तबगार मंडळी नंदिवर्धनला पाठवली होती. प्रभावतीगुप्तानं लवकरच राज्यकारभाराचा सगळा भार सांभाळला. तिची स्वत:ची राजमुद्रा होती-
‘वाकाटक ललामस्य क्रमप्राप्तनृपश्रिय:।
जनन्या युवराजस्य शासनं रिपुशासनम्‌।।’
(वाकाटकांची गौरवी राज्यलक्ष्मी वंशपरंपरेनं ज्याला प्राप्त झाली आहे अशा युवराजाच्या मातेचे हे शत्रूंना शासन करणारे शासन (राज्य) आहे.)
 
माहेरचं परम दैवत श्रीविष्णूची निस्सीम भक्त असल्यामुळे तिनं आपल्या कार्यकाळात नरिंसहाची आणि वराहाची मंदिरं बांधली. त्यापैकी रामटेकच्या पायथ्याशी असलेली केवलनरिंसहाची जुळी मंदिरं वाकाटककालीन वास्तुशैलीची सगळी वैशिष्ट्यं मिरवत आजही उभी आहेत. शिवाय गडावर असलेला यज्ञवराह आणि जवळच असलेला त्रिविक्रम ही शिल्पं आजही मन मोहून टाकतात. केवलनरिंसहाच्या मंदिरात असलेला प्रभावतीगुप्ताचा शिलालेख वाकटक राजवंशावलीची, तर पुण्याला सापडलेला प्रभावतीगुप्ताचा ताम्रपट गुप्तवंशाची विस्तृत माहिती देतो.
 
सम्राट चंद्रगुप्तानं सन 397 ते 409 या 12 वर्षांच्या काळात भारताच्या पश्चिम भागावर आक्रमण करून हिंदुकुश पर्वतरंगांपासून राजस्थान, गुजरात आणि मध्य भारतावर कब्जा करून बसलेल्या पश्चिमी क्षत्रप म्हणजेच शकांना नामोहम करून त्यांचा कायमचा बंदोबस्त करत त्यांना भारत सोडायला लावण्याची मोहीम हाती घेतली.
 
शकांचा नायनाट करून गुजरात आणि राजस्थानवर सत्ता मिळवल्यानंतर सम्राट चंद्रगुप्त द्वितीयाची विक्रमादित्य आणि शकारि (शकांचा कर्दनकाळ) ही दोन बिरुदं धारण केली. या काळात मध्यभारतावर अधिराज्य असणार्‍या प्रभावतीगुप्तानं आपल्या वडिलांना सर्वार्थानं मदत केली. किंबहुना ही सगळी मोहीमच पाटलीपुत्राहून न राबवता नंदिवर्धनहून राबवण्यात आली असावी, कारण भौगोलिकदृष्ट्या तेच सर्वात सोयीचं होतं.
 
गुप्तांच्या सैन्याला सगळी रसद आणि शस्त्रास्त्रं वाकाटकांच्या बलाढ्य साम्राज्यातून विनासायास उपलब्ध होत असत आणि त्याच्याच भरोशावर 12 वर्षांचा प्रदीर्घ संघर्ष यशस्वी झाला.
 
याच कालखंडात युवराज दिवाकरसेनाचा अकाली मृत्यू झाला, पण ते दु:ख पचवत राजमातेनं स्वत:ला सावरलं. धाकटा राजपुत्र दामोदरसेनाचा युवराज्याभिषेक करून ती राज्यकर्ती राहिली. दामोदरसेनाचा राज्याभिषेक झाल्यानंतर त्यानंच प्रवरसेन नाव धारण केलं, असं अभ्यासकांचं मत आहे. तो राजा झाल्यानंतरही प्रभावतीगुप्ता राजमाता म्हणून कामकाजावर नियंत्रण ठेवून होती. तिच्या हयातीतच प्रवरसेनही मरण पावला.
 
महामहोपाध्याय वा. वि. मिराशी यांनी केलेल्या संशोधनानुसार याच कालखंडात चंद्रगुप्ताचे राजकवी कालिदास नंदिवर्धनला येऊन राहिले आणि तिथून केवळ अर्ध योजन (पाच किलोमीटर) अंतरावर असलेल्या रामगिरीवर त्यांनी मेघदूत हे महाकाव्य रचलं.
कश्चित्कान्ता विरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत:
शापेनास्तङ्‌गमितमहिमा वर्षभोग्येण भर्तु:
यक्षश्चक्रे जनकतनया स्नानपुण्योदकेषु
स्निग्धच्छायातरुषु वसिंत रामगिर्याश्रमेषु 
(कोणी एक यक्ष आपल्या कर्तव्यात चुकला म्हणून यक्षराजानं त्याला एक वर्षभर पत्नीचा विरह होईल असा शाप दिला. त्यामुळे सामर्थ्य क्षीण झालेला तो (यक्ष) सीतेच्या स्नानामुळे पवित्र झालेले जलकुंड आणि घनदाट वृक्षांची स्निग्ध छाया असलेल्या रामगिरीच्या कुटीमध्ये राहू लागला.)
 
हा मेघदूताचा पहिला श्लोक. श्रीराम, सीता आणि लक्ष्मण वनवासात असताना काही दिवस या लहानशा डोंगरावर राहून गेले आणि म्हणून त्याला रामगिरी म्हणत. ही मान्यता इसवीसनाच्या चौथ्या शतकाआधीपासून इथे रुजली आहे. निर्णयक्षमता आणि निर्णयस्वातंत्र्याचा वापर हा सीतेच्या कर्तव्यपरायण, सात्त्विक आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू. त्याचा अंश या रामगिरीच्या मातीत, इथल्या वातावरणात आजही जाणवतो.
 
कवी कालिदासाला विदर्भाची ही भूमी इतकी आवडली की, इथे संपन्न झालेल्या अत्यंत रसाळ म्हणूनच रसिकमान्य मेघदूत या काव्याची शैलीच वैदर्भी या नावानं ओळखली जाऊ लागली. मधुर व्यंजनांनी युक्त, दीर्घ समासरहित आणि छोटे सामासिक शब्दांची लालित्यपूर्ण पदरचना, श्लेष आणि अन्य अलंकारांचा गुणात्मक वापर असलेली काव्यशैली म्हणजे वैदर्भी शैली. भारतीय काव्यशास्त्रात ही सर्वोत्तम शैली असल्याचं प्रतिपादन करण्यात आलं आहे.
 
ही सगळी ऐतिहासिक तथ्यं डोळ्यांसमोर असताना, उलगडलेला तपशील थक्क करणारा आहे. भारतीय स्त्रीच्या विविधांगी सामर्थ्याचा आलेख स्पष्ट होतो. 100 वर्षांहून अधिक आयुष्य लाभलेल्या या राजमातेचं कर्तृत्व असामान्यच होतं. प्राचीन भारतीय परंपरेत ‘दुहिता’ म्हणजे सासर आणि माहेर दोन्ही कुळांना हितकारक असलेली भूमिका तंतोतंत पार पाडली.
 
तिच्या शिलालेखात आणि ताम्रपटांत तिच्या सासरच्या गौरवपूर्ण उल्लेखांसह माहेरच्या कुलाचाही तितक्याच अभिमानानं उल्लेख आहे. ती आपल्या माहेरचंच नाव आणि ‘धारण’ गोत्र लावत असे आणि त्याची स्पष्ट नोंदही करत असे. एकीकडे राजमाता प्रभावतीगुप्ताचा प्रखर पराक्रम आणि दुसरीकडे कालिदासाचं काव्यशास्त्रविनोदाचं अतुलनीय प्रगटन एकाच वेळी घडलं ते रामगिरीच्या परिसरात.
 
ज्या वेळी स्त्रीवाद-फेमिनिझम वगैरे संकल्पनांचा विचारही नव्हता त्या वेळी प्रभावतीगुप्ता स्त्रीसामर्थ्याचा विचार सार्थ करून गेली. आजच्या आधुनिक विचारांच्या महिला आपल्या पतीचं नाव न लावता कागदोपत्री आपलं लग्नाआधीचंच माहेरचं नाव कायम ठेवतात आणि तेच व्यवहारातही वापरतात. त्या सगळ्या प्रभावतीगुप्ताच्याच पावलांवर पाऊल ठेवत आधुनिकतेची गुढी पुढे नेत असतात. भारतीय स्त्रीसामर्थ्याचा तेजाळणारा इतिहास आणि प्रतिभेचा सर्वोत्तम आविष्कार एकाच वेळी अनुभवणारा रामगिरीचा हा परिसर आपलं आणखी एक अभिमानस्थळ!
लेखिका संवादशास्त्र, जनमाध्यम आणि भारतीय संस्कृतिशास्त्र या विषयाच्या अभ्यासक आहेत.
 
••