मेळघाटी विश्वकोश रवींद्र वानखडे!
   दिनांक :21-Apr-2019
‘‘मी रानवेडा, जंगलात भटकणारा, जंगलाच्या प्रेमात कायम बुडालेला, डोळ्यांतल्या हिरवाईसह रानातल्या भन्नाट अनुभवाचा ठेवा असलेला! जंगलात िंहडताना त्याविषयी अधिक संवेदनशील बनलो. वने व वन्यजीव केवळ समजूनच न घेता त्यात जगायला लागलो. वनखात्यात अधिकारी होणार असे मनातही नव्हते, पण माझ्या भोवताली एक तेजोवलय आहे. माझा जन्मच जणू वनांसाठी झाला की काय, असे वाटत राहते. वनविश्वाच्या खोलात जाऊन ते कसे समजून घ्यावे, याचा वस्तुपाठचं मनात मी ठरविलाय. मेळघाट खर्‍या अर्थाने माझा जीव की प्राण! माझी भारतभर ओळख असूनही माझे पाय कायम जमिनीवरच! मेळघाट, निसर्गाने मुक्तहस्ते सृष्टिसौंदर्याची उधळण केलेलं वसुंधरेचं हिरवं लेणं! मेळघाट शब्द उच्चारताच माझ्या मनात वाघोबाच्या डरकाळीपासून ते मुंग्यांच्या वारुळापर्यंतच्या अनेक आठवणी कायमच्या घर करून आहेत. जीवसृष्टीला आकार देऊनही निर्गुण निराकार जंगलातूनच मानवजातीला जिवंत राहण्याचे तंत्र, जीवन सुखी करण्याचे यंत्र आणि जीवनाचं सार्थक करण्याचे मंत्र गवसलेत. जंगलाकडून हे सगळं घेत असताना आपणही जंगलाचं काहीतरी देणं लागतो, हे कायम मनात ठेवून जगणारा वनाधिकारी म्हणजे मी रवींद्र वानखडे होय...’’
 
 
 
सन 1984 मध्ये रवींद्र वानखडे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र वनसवेत सहायक वनसंरक्षक म्हणून निवड झाली. नियुक्तीनंतर त्यांनी कोईम्बतूरला दोन वर्षांचं प्रशिक्षण पूर्ण केलं. दि. 3 जानेवारी 1986 मध्ये त्यांनी बुलढाणा व नंतर सहा महिने यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे सेवा दिली. भारतीय वन्यजीव संस्था, देहरादून येथून वन्यजीव संवर्धनाचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी जळगाव खानदेश येथे दीड वर्ष सेवा दिली. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात जन्मलेल्या रवींद्र वानखडे यांचं आयुष्य कुठल्याही दंतकथेपेक्षा कमी नाही. मेळघाटात राज्य चालतं ते तापी व सिपना नदीचं. बावीस वर्षांपूर्वी याच सिपनेच्या पात्राजवळून सेमाडोहपासून सुरू झालेली त्यांची मेळघाटातील वनसेवा म्हणजे एक इतिहास आहे. आजही अख्खा मेळघाट पायी फिरून पालथा घालणारा एकमेव अधिकारी म्हणून सरांची ओळख अबाधित आहे. एक एक पाणवठा आणि एक एक वनक्षेत्र मुखपाठ असलेल्या वानखडे सरांना मेळघाटची इत्थंभूत माहिती आहे. मेळघाटला आणि येथील वन्यजीवांना खर्‍या अर्थाने समजून घेणारा अधिकारी म्हणून मी त्यांचा उल्लेख करेल. त्यांची मेळघाटची सेवा म्हणजे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकरिता सुवर्णकाळ म्हटल्यास वावगे ठरू नये. म्हणूनच सरांना मेळघाटचा एन्‌सायक्लोपीडिया म्हणून उपाधी दिली आहे. पुढे ऑक्टोबर 1990 ते 1997 पर्यंत मेळघाटमध्ये सहायक वनसंरक्षक म्हणून सेवा देतानाच विभागीय वनाधिकारी म्हणून त्यांची बढती झाली. अमरावती येथील कार्यआयोजना कार्यालयात सेवा दिली. सप्टेंबर 1997 ते मे 2000 पर्यंत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक म्हणून त्यांनी कामकाज पहिले. मे 2000 पासून ऑक्टोबर 2004 दरम्यान वन प्रशिक्षण संस्था चिखलदरा येथे संचालक म्हणून काम करताना त्यांनी मोलाची भूमिका पार पडली. ऑक्टोबर 2004 ते जुलै 2009 मध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक म्हणून कार्य करताना सरांची कारकीर्द उत्कृष्ट वन्यजीव व्यवस्थापनाच्या दृष्टीने स्मरणात राहणारी ठरली. सन 2009 ते सन 2013 दरम्यान त्यांनी महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ येथे विभागीय व्यवस्थापक म्हणून कामकाज केले. पुढे 2013 ते 2017 मेळघाटमध्ये सेवा देत असतानाचा एप्रिल 2017 मध्ये त्यांची बढती होऊन ते वनसंरक्षक म्हणून सामाजिक वनीकरण विभाग, अमरावती येथे रुजू झालेत. नोव्हेंबर 2017 मध्ये बदली होऊन सध्या ते पुणे वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक म्हणून कार्यरत आहेत.
 
अमरावती जिल्ह्यात जन्मलेल्या वानखडे सरांनी चौथीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत घेतले. पुढे सातारा येथे सैनिक शाळेत 12 वी पर्यंत शिक्षण घेऊन विज्ञान विषयात अमरावतीच्या विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेतून त्यांनी पदवी पूर्ण केली. भौतिकशास्त्र विषयात एम. एस्सी. करताना व सैनिक सेवेत जाण्याची तयारी सुरू असतानाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून सहायक वनसंरक्षक या वर्ग एकच्या पदी त्यांची निवड झाली. तदनंतर त्यांनी एल.एल. बी.देखील पूर्ण केले. वन प्रशिक्षण कालावधीत त्यांना सुवर्णपदक प्राप्त झाले होते. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकरिता उत्कृष्ट वन्यजीव व्यवस्थापन नियोजनाबद्दल त्यांना सुवर्णपदक मिळालेलं आहे. सन 1990 ते 1997 दरम्यान मेळघाट व्याघ्र प्रकल्पात संशोधन अधिकारी म्हणून कार्य करताना बाबासाहेब ढोरे यांच्यासोबत काम करतानाचे दिवस अधिक आठवणीत असल्याचे त्यांना वाटते. वनस्पती व प्राण्यांची खर्‍या अर्थाने मैत्री याच काळात अधिक फुलत गेल्याचे ते आवर्जून सांगतात. व्याघ्रगणनेचा त्यांचा अनुभव सर्वोत्कृष्ट असल्याचे सर नेहमी म्हणतात. कुठलाही बडेजाव न करता प्रत्यक्ष वन अधिवासात मचाण व संरक्षक कुटीवर मुक्काम करणे, वनरक्षकाबरोबर पायी गस्त करणे हे सरांच्या आवडीचं काम! त्यांची ही कार्य करण्याची शैली सर्वश्रुत व वैशिष्ट्यपूर्ण आहे. सन 1989, 1993 व 1997 मधील व्याघ्रगणनेच्या माहितीचे मूल्यमापन करण्याचा अनुभव त्यांच्या खूप आवडीचा असल्याचे ते सांगतात. वनरक्षकाच्या खांद्याला खांदा लावून वनवणवा विझविण्यासाठी जाताना एकदा माझी सरांशी मेळघाटात भेट झाली. म्हणूनच वनसंवर्धन, वनप्रशिक्षण, वनप्रशासन अशा वेगवेगळ्या अंगाने उत्कृष्ट व प्रामाणिक कार्य करणार्‍या वानखडे सरांना मानाचा मुजरा...! आपल्या संपूर्ण आयुष्याचं वानप्रस्थ करून दररोजच नि:स्वार्थ सेवा करणार्‍या या अवलिया अधिकार्‍याचं अरण्यक असंच सुरू राहणार आहे. जे असतील त्यांच्यासह, जे नसतील त्यांच्याशिवाय...!
यादव तरटे पाटील
वन्यजीव अभ्यासक, दिशा फाउंडेशन, अमरावती.
9730900500