'या' अभिनेत्रीने नाकारली २ कोटींची जाहिरात !
   दिनांक :21-Apr-2019
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका साई पल्लवीने एका फेअरनेस क्रिमच्या जाहिरातीला नकार दिला आहे.  साई पल्लवीला २ कोटी रूपये इतके मानधन मिळत असल्यावरही तिने जाहिरात करण्यास नकार दिले. याला कारण आहे तिचे तत्व.
 
 
चित्रपटांतही कमीत कमी मेकअप करणारी अभिनेत्री म्हणून साई पल्लवी ओळखली जाते. खऱ्या आयुष्यातही ती अगदी क्वचित सौंदर्य प्रसाधनांचा वापर करते. त्यामुळे केवळ पैशांसाठी फेअरनेस क्रिमची जाहिरात करण्यास तिने नकार दिला. खुद्द साईने याबद्दल माहिती दिली. ‘मी स्वत: सौंदर्य प्रसाधनांना पाठीशी घालत नाही. तुम्ही स्वत:विषयी, त्वचेच्या रंगाविषयी आत्मविश्वास बाळगलाच पाहिजे’, असे तिने सांगितले.
साई पल्लवी हिने २०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार यश मिळवून दिले. यानंतर आलेले ‘अथिरन’, ‘मारी २’ हे तिचे दोन सिनेमेही प्रचंड गाजले. या चित्रपटांनी साई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली. साई पल्लपी ही अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे. आता तत्त्वांसाठी जगणारी अभिनेत्री अशी तिची आणखी एक ओळख निर्माण झाली आहे.