शिवा थापाचा विजयी प्रारंभ
   दिनांक :21-Apr-2019
आशियाई बॉक्सिंग स्पर्धा
आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेतील ६० किलो वजनी गटात शिवा थापाने विजयी प्रारंभ केला. या विजयासह उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करीत थापाने या स्पर्धेत चौथ्यांदा पदक मिळवण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे, तर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यविजेती लोवलिना बोरगोहाइनने ६९ किलो गटात आणि दीपकने ४९ किलो गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
 
 
थापाने कोरियाच्या किम वोन्होवर ४-१ असा विजय मिळवला. थापाने २०१३, २०१५ आणि २०१७मध्ये अनुक्रमे सुवर्ण, कांस्य आणि रौप्यपदक पटकावले आहे. पुढील फेरीत थापाला किरगिझस्तानच्या सेटबेक उलू याच्याशी झुंजावे लागणार आहे. लोवलिनाने उप-उपांत्यपूर्व फेरीत व्हिएतनामच्या त्रान थि लिन्ह हिला ५-० असे पराभूत केले. त्यामुळे आता उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपेईच्या खडतर चेन निएन चीनच्या खडतर आव्हानाचा तिला मुकाबला करावा लागणार आहे. तर दीपकने श्रीलंकेच्या मुतुनाका पेडी गेदरावर ५-०ने मात करीत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली आहे.