बॉम्बस्फोटाचे राजकारण करू नका : संगकारा
   दिनांक :21-Apr-2019
कोलंबो,
श्रीलंकेत ईस्टर संडेच्या दिवशी आठ साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले. या भयानक दहशतवादी हल्ल्यात जवळपास 200 लोकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. या हल्ल्यानंतर जगभरातून याचा निषेध होत आहे. असाच निषेध श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने केला आहे. निषेध व्यक्त करतानाच देशवासीयांना शांत राहून हल्ल्याचे राजकारण करणाऱ्यांचे प्रयत्न हाणून पाडण्याचे आवाहन त्याने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमधून केले आहे.
 
 
आज सकाळी श्रीलंकेत आठ साखळी बॉम्बस्फोट झाले. यामध्ये आतापर्यंत २०८ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत तरी या स्फोटाची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. त्यामुळे श्रीलंकेत अफवांचे आणि तर्कांचे पेव फुटले आहे. अखेर श्रीलंकन सरकारला संचारबंदी आणि इंटरनेट सेवा बंद करावी लागली. दरम्यान, श्रीलंकन क्रिकेटपटू संगकारानेही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट टाकत या भ्याड हल्याचा निषेध व्यक्त केला.
 
 
 
याच बरोबर त्याने ‘आपल्याला आता कोणताही आतातायीपणा न करता विचार करावा लागेल. आपण एक श्रीलंकन म्हणून एकत्र राहण्याची गरज आहे. जर आपण दुभागलो गेलो तर आपण या कठीण प्रसंगातून बाहेर पडण्याची शक्यता कमी आहे. तसेच आपण कोणत्याही अफवांना कट कारस्थानांना बळी पडू नये. जे या दुर्दैवी घटनेवर राजकारण करत आहेत अशा निर्लज्जांचा डाव हाणून पाडा. तपास यंत्रणांना त्यांचे काम करु द्या. हा भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना न्यायव्यवस्थेसमोर उभे करु.’ असे आवाहन आपल्या देशवासीयांना केले.
 
याचबरोबर संगकाराने ‘आता आपल्या सगळ्यांचा फोकस हा या हल्ल्यात प्रभावित झालेल्यांना धीर देणे आणि त्याना मदत करणाऱ्या संस्थांना, व्यक्तींना आणि जखमींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे हात बळकट करणे असला पाहिजे.’ असेही सांगितले. तसेच आपणाला आता अशा प्रकारची दुःखद घटना पुन्हा होवू नये यासाठी एकत्रित काम करावे लागेल असेही संगकारा म्हणाला.