शहाणे करुनि सोडावे सकलजन!
   दिनांक :21-Apr-2019
अफझलखान वधानंतर महाराजांनी उडविले तुफान आपण मागील लेखात अनुभवले. राजांनी पन्हाळगडासारखा भक्कम गड एका झटक्यात हस्तगत केला. राजांची ही धडक इतकी विलक्षण होती की- आदिलशाहीला धड विचार करायलाही उसंत मिळत नव्हती. रोज दररोज काही न काही जाण्याच्याच बातम्या पोहोचत होत्या. तरीही आदिलशाहीने स्वतःला सावरले व रुस्तमेजमानच्या नेतृत्वामध्ये एक फौज तात्काळ राजांवर धाडली. पण शिवाजीराजांना ही बातमी कळली अन्‌ राजांनी उघड्या आसमंतात युद्धाचा पवित्रा घेतला. मराठ्यांनी जबरदस्त धडक दिली अन्‌ शस्त्रू सैन्याचा धुव्वा उडाला. हा दिवस होता 28 डिसेंबरचा! आदिलशाही शेवटच्या घटका मोजत होती. एवढ्यात संजीवनीच्या रूपाने करनूलचा सुभेदार सिद्दी जौहर हा स्वतः आदिलशाही अन्‌ स्वराज्य यांच्यामध्ये उभा ठाकला. जवळपास पस्तीस हजार फौज घेऊन जौहर स्वराज्यावर धडकणार होता. शिवाजीराजांना या बातम्या पोहोचल्यात. राजे त्वरित पन्हाळाच्या रोखाने निघाले. राजांकडे या वेळी सुमारे आठ हजार फौज होती. राजे गडावर पोहोचले अन्‌ काही दिवसांतच सिद्दीचा वेढा पडला. राजे आपल्या फौजेनीशी घेरल्या गेलेत. पन्हाळ्याचा आश्रय घेण्यामागे राजांचे काही नियोजन नक्कीच असावे. जसे हा किल्ला स्वराज्याच्या नव्या सीमेवर होता, शत्रू आला तरी यामुळे स्वराज्याला थेट नुकसान पोचणार नव्हते. गडावर भरपूर प्रमाणात रसद साठवून ठेवण्यात अली होती. सरनौबत गडाबाहेर असल्याने त्यांची मदत बाहेरून मिळू शकणार होती. शिवाय पावसाळा सुरू झाल्यावर सिद्दीची मोहीम आपोआपच बारगळेल, असा राजांचा अंदाज होता. पण एक गोष्ट मात्र नक्की होती की- राजे पहिल्यांदा अशा एका जीवघेण्या वेढ्यात सापडले होते, तिथून तूर्तास बाहेर येणे शक्य नव्हते.
 
 
 
आदिलशाहीने मोर्चेबांधणी करताना मोग्लंशीही संधान जोडले होते. मागे शाहजहान आजारी असल्याने औरंगजेब दख्खनकडे लक्ष देऊ शकला नव्हता. पण तो आता दिल्लीमध्ये स्थिरावला होता. राजांचा अंदाज होता की मोगल सुन्नी असल्याने ते शियापंथी आदिलशाहीला साथ देणार नाही. आणि आपण जर आदिलशाहीला झोडपले तर औरंगजेब आपल्याला मदत करेल. पण इथेच एक गडबड झाली, औरंगजेब सुन्नी असला तरी त्याला संपूर्ण भारतावर स्वतःची सत्ता हवी होती व त्यामध्ये शिवाजी हा नवा अडसर ठरू पाहतोय्‌ हे त्याला कळून चुकले होते. आता त्याला शिवाजी राजांचा बदला घेणे आवश्यक होऊन बसले होते. स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी प्रचंड मोठी तयारी मुगलिया सल्तनतमध्ये सुरू झाली. एका जबरदस्त व्यक्तीची नियुक्ती औरंगजेबाने केली होती, त्याचे नाव होते- शाहिस्तेखान! खान-इ-खानान, अमील-उल-उमराव, नवाब-ए-आझम, मिर्झा, अबू तालिब शाहिस्ताखान. औरंगजेबाची आई मुमताज-उल-जमानी हीचा सख्खा भाऊ, औरंगजेबाचा सख्खा मामा आणि मुगलीया सल्तनतीचा सरनौबत शाहिस्ताखान. त्याच्यासोबत शमसखान पठाण, नामदारखान, लोदीखान, भाविंसह हाडा आदी अनेक पराक्रमी व नामवंत सरदार तसेच माहूरची राय बाघन सावित्रीदेवीसुद्धा होती. शाहिस्तेखानाकडे सत्याहत्तर हजार घोडदळ व अगणित पायदळ होते. खजिना, दारूगोळा याला काहीही कमी नव्हती. आल्या आल्या खानाचा वरवंटा स्वराज्यावर फिरला होता.
 
अफझलखान मोहीम लहान वाटावी, असे अवाढव्य संकट स्वराज्यावर येऊन आदळले होते. अडकित्यात सुपारी सापडावी तसे स्वराज्य या दुहेरी संकटाच्या गर्तेत चालले होते. एकमेव आशा होती व ते म्हणजे शिवराय, पण ते ही वेढ्यात अडकलेले. पावसाळा सुरू होऊनही सिद्दी वेढा मजबूत आवळून उभा होता. अशा वेळेस स्वतः जिजामाता पूर्ण स्वराज्याची काळजी घेत होत्या. किल्ल्याचेे रक्षण व मुलकी प्रशासन अशा दोन्ही बाबींवर त्यांचे बारीक लक्ष होते. इतकेच नाही तर वेढा फुटत नाही हे पाहून त्या स्वतःच जौहरवर आक्रमण करण्यासाठी निघणार होत्या. पण नेतोजींनी त्यांना थांबवले व ते स्वतः आक्रमण करण्यास निघाले. पण त्यांचीही मात्र चालेना. गडावरचा दाणागोटा संपत आलेला होता.
 
तिकडे शाहिस्तेखानसुद्धा हातपाय पसरतच होता. अनेक मंदिरांचा विध्वंस, नरसंहार, लुटपाट, जाळपोळ आदी मुगलांच्या पारंपरिक अत्याचारांना ऊत आला होता. सासवड, पुणे, सुपे, इंदापूर या ठिकाणांचे स्वातंत्र्य धोक्यात आले होते. शाहिस्ताखानाला आवरू शकेल असे आता कुणीही नव्हते कारण स्वराज्याच्या लष्कराचा आकडा अत्यंत मर्यादित होता. काही लष्कर नेतोजींकडे तर काही महाराजांकडे होते. मूठभर फौज खानाचे काय वाकडे करू शकणार होती, त्यामुळे खानाचा अनिर्बंध संचार सुरू होता. आणि आता हे मळभ भरून आले होते चाकणच्या किल्ल्यावर. होय- चाकणचा गड, किल्ले संग्रामदुर्ग!. (हा भुईकोट असून तो पुणे-नाशिक मार्गावर आहे.) आकाराने लहान असला तरी तो स्वराज्याच्या सरहद्दीवरचा किल्ला असल्याने अतिशय महत्त्वाचा होता. इथे शिबंदी होती, साधारण चारशे ते पाचशे व किल्लेदार होता- फिरंगोजी नरसाळा! जवळपास वीसहजार मोगली फौज संग्रामदुर्ग घेण्यासाठी येऊन धडकली. अन्‌ आश्चर्य म्हणजे मराठी सैन्य पळाले नाही, तर त्यांनी युद्धाचा पवित्रा घेतला. जोवर शिवाजीराजे पन्हाळ्यावर जौहरशी झुंजतील तोवर आम्हीही संग्रामदुर्ग लढवितो, अशी इथल्या मावळ्यांनी जणू काही प्रतिज्ञाच केली होती. मराठ्यांनी बारुदीने ठासलेले बाण, दगड, दारुगोळा आदी सर्व सज्ज ठेवले होते. खानाचा घाला आला आणि मराठी सेनेने एल्गार केला. बाणांचा अन्‌ दगडांचा वर्षाव सुरू झाला. खानाची सेना मागे रेटल्या गेली व एक सीमारेषा तयार झाली. दिवसभर मोगलांनी गडावर हल्ल्याचा प्रयत्न करावा व मराठ्यांनी त्यांना रोखून धरावे. आक्रमण करून त्यांची सेना थकून झोपी जात नाही तर रात्री मराठे गडाबाहेर पडून अकस्मात त्यांच्या छावणीवर छापा घालत, वारेमाप कत्तल उडवीत, मोगल जागे झाले की मराठे पसार होत. त्यांनी पाठलाग केलाच तर मराठी सेना गडामधे शिरत असे व मोगल जवळ आलेच तर गडावरून पुन्हा अग्निवर्षा होत असे. एवढासा गड, चारशे लढवय्ये आणि तरीही ते मोगलांच्या वीस हजार सैन्यापुढे अंगदासारखे पाय रोवून उभे ठाकले होते. खानाचे जुने जाणते पराक्रमी सरदार चौतर्फा आक्रमण करतच होते पण संग्रामदुर्गाने पराक्रमाची शर्थ केली. सीमावर्ती किल्ला असल्याने महाराजांनी तिथे रसद अन्‌ दारुगोळ्याची प्रचंड व्यवस्था करून ठेवली होती, हे जरी सत्य होते तरी लढाई माणसांनाच करायची होती. माणसेच कच खाणारी असतील तर तुमच्याकडे किती रसद आहे, याला महत्त्व उरत नाही. या मूठभर लोकांनीशी हा किल्ला किती लढावा? संग्रामदुर्गाचा संग्राम तब्बल पंचावन्न दिवस चालला. मराठ्यांच्या युद्धोत्साहाने खानाला अक्षरशः पाणी पाजले. अखेर सुरुंग लावून बुरुज उडविण्यात खानाला यश आल्यानंतर काही दिवसांनी हा किल्ला शरण आला. पण मराठ्यांच्या या पराभवातही विजय त्यांच्या लढाऊ वृत्तीचा झाला होता. खानाच्या विजयाला मात्र खुनशी विजिगिषू वृत्तीची व बेदरकारपणाची झालर होती. फिरंगोजीला दुसरा मार्ग उरला नव्हता. त्याला गड मोगलांच्या हाती द्यावा लागला. पण पुढे महाराजांनी केल्या पराक्रमाबद्दल त्याची जाहीर रीतीने पाठही थोपटली होती.
 
आज तुम्ही कुठेही नोकरी करा अथवा व्यवसाय करा, तुम्हाला जर यशस्वी व्हायचे असेल तर लढवय्ये उभे करावे लागतात. परिस्थिती कशीही असो, आम्ही लढूनच दाखवू अशा उत्साहाने रसरसलेले लोकच यशस्वी संस्था उभ्या करत असतात. पगार, सोयीसुविधा, सुट्‌ट्या, बोनस हे सगळं दिले म्हणून लोक झोकून काम करतीलच असे नाही. मुळात त्यांच्यात ती इच्छाशक्ती आवश्यक असते. इच्छाशक्तीने ओतप्रोत भरलेले लोक जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्यांच्याजवळ काही सोयिसुविधा असो अथवा नसो, ते यश खेचून आणतात हा सार्वत्रिक अनुभव आहे. पण यासाठी लोकांचे सातत्याने समुपदेशन व प्रशिक्षण अत्यावश्यक असते. या समुपदेशन व प्रशिक्षणाची सातत्यपूर्ण व्यवस्था असावी लागते. त्याची जबाबदारी अभ्यासपूर्ण मांडणी करणार्‍या अनुभवी लोकांकडे द्यावी लागते. प्रशिक्षणानंतर त्याचा खरंच काही उपयोग झाला का अथवा कार्यप्रणालीमध्ये काही बदल झाला का, हे पाहण्यासाठी नियमित अवलोकन आवश्यक असते. चांगले प्रशिक्षक जोडून ठेवणे व त्यांच्याकडून नित्यनेमाने विषयांची मांडणी करणे, ही क्रिया सतत चालत राहावी लागते. कालांतराने यातूनच माणसे घडत जातात. असे म्हटले जाते की- जे उद्योग कर्मचार्‍यांना विकत घेऊ शकत नाही, त्यांनी कर्मचारी घडवावे. शिवाजी महाराजांना त्यांचे सवंगडी विकत मिळाले नाहीत तर त्यांनी ते महत्प्रयात्नातून घडविले होते. महाराजांची प्रशिक्षणाची पद्धत काय होती, त्यात कशा कशाचा समावेश होता, हे काम कोण सांभाळीत होते याचा आज दुर्दैवाने एकही पुरावा आपल्या हाती नाही. विचार करा तो जर असता तर प्रशिक्षण आणि विकास या क्षेत्रात आपण किती मोठे काम करू शकलो असतो. पण आज परिस्थिती आपल्या हाती आहे. आमच्याकडे कुणी काम करत नाही, दिलेली जबाबदारी पूर्ण करत नाही, ढेपाळलेले असतात, त्यांची मानसिकताच नाही, त्यांचे आपापसात जमतच नाही, अशी नकारघंटा वाजविण्यापेक्षा ‘आपल्या संस्थेचा माहौल असा कसा बदलत नाही, मी बदलवून दाखवतो,’ असे म्हणणार्‍या खंबीर नेतृत्वाची आवश्यकता असते. आणि मनावर घेतले तर कुठल्याही संस्थेचा चेहरामोहरा बदलायला दोन वर्षांच्या वर काळ लागत नाही. पण तसे नेतृत्व, दिशा, प्रयास, प्रशिक्षक व ध्येय अत्यावश्यक असते. स्वकर्तुत्वाने आपले आयुष्य व आपल्या संस्थांच्या दिशा बदलणारे लोक आम्ही नियमित बघत असतो. माझ्याही आयुष्यात अशी कमतरता असेल तर स्वप्रयत्नाने मी तिचे निर्मूलन करून आयुष्य आनंददायी बनवेल, अशा जिद्दीने आपण पेटावे व आपल्या संस्था सर्वांगसुंदर कराव्यात, हीच सदिच्छा!
• डॉ. सुमंत दत्ता टेकाडे
9923839490 
(लेखक कार्पोरेट आणि
व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षक आहेत.)
••