‘जिवलगा’ या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला
   दिनांक :21-Apr-2019
एक वेगळा विषय असलेली मालिका ‘जिवलगा’ लवकरच स्टार प्रवाहवर सुरु होतेय. या मालिकेमध्ये अभिनेता स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर हे दोघे अनुक्रमे सात आणि नऊ वर्षांनी छोट्या पडद्यावर झळकणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत अभिनेत्री अमृता खानविलकर आणि मधुरा देशपांडे या अभिनेत्रीही स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यामुळे या मालिकेविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. मात्र आता प्रेक्षकांची उत्सुकता लवकरच शमणार आहे. कारण ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
 
 
 
‘स्टार प्रवाह’ वरील बहुचर्चित आगामी मालिका ‘जिवलगा’ ही येत्या २२ एप्रिलपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता स्टार प्रवाहवर सुरू होणार आहे. आघाडीचे अभिनेते स्वप्नील जोशी व सिद्धार्थ चांदेकर हे बऱ्याच वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुनरागम करत आहेत. तसेच हिंदी आणि मराठी पडदा गाजवणारी अमृता खानविलकर पहिल्यांदाच दैनंदिन मालिकेमध्ये अभिनय करताना दिसणार आहे. त्यांच्याबरोबर मधुरा देशपांडेही  या मालिकेत दिसणार आहे. 
 
“जो डोळे बंद केल्यावरही दिसतो, तो जिवलगा.. ज्याच्यामुळे आपण आहोत, तो जिवलगा..” अशा आशयाची ही प्रेमकथा असून नुकतेच या मालिकेचे शीर्षक गीत सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आणि प्रेक्षकांनी देखील याला भरभरून दाद दिली आहे. ही मालिका एक प्रकारची प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरेल यात काही शंका नाही.
 
डॉ. चंद्रशेखर फणसळकरांच्या गोष्टीपासून प्रेरणा घेतलेली ही मालिका आहे. तर मालिकेची संकल्पना स्टार प्रवाहचे कॉन्टेन्ट अँड प्रोग्रामिंग विभागाचे प्रमुख सतीश राजवाडे यांची आहे. विद्याधर पाठारे यांनी या मालिकेची निर्मिती केली असून पराग कुलकर्णी यांनी या मालिकेचे लेखन केले आहे. ही मालिका उमेश नामजोशी हे दिग्दर्शित करत आहे.