चहा की दूध?
   दिनांक :21-Apr-2019
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षात नेमकी काय कामगिरी केली याबद्दल मतभेद राहू शकतात. पाठीराखे म्हणतील खूप काम केले. विरोधक म्हणतील नुसत्याच घोषणा केल्या. पण एक मुद्दा मात्र सर्वांना मान्य करावा लागेल. चायवाला आणि चौकीदार हे दोन शब्द त्यांच्या व्यवसायासह मोदींनी प्रतिष्ठित केले, तसेच त्यांना सतत चर्चेच्या केन्द्रस्थानी ठेवण्यात यश मिळविले. विशेषत: मोदीविरोधकांना या दोनपैकी एकाचा उल्लेख केल्याशिवाय पुढेच जाता येत नाही, अशी स्थिती आज आलेली आहे. मोदींची तारीफ करायला आणि त्यांच्यावर टीका करायलाही, चायवाला किंवा/आणि चौकीदार यांचा सहारा घ्यावाच लागतो बघा.
 
 
 
राफेल प्रकरणापासून चायवाला थोडा मागे पडला आणि चौकीदाराचे प्रस्थ फारच वाढले! राहुल गांधींनी चौकीदार चोर है... असा नारा देऊन तो देशभर पोहोचवला. याला प्रत्युत्तर म्हणून भाजपाने मै भी चौकीदार मोहीम राबवली. अनेक लोक स्वत:ला चौकीदार म्हणवून घेऊ लागले. ट्विटर, व्हॉट्स अॅप, फेसबुक या सोशल मीडियावर अनेक चौकीदार व्यक्त होऊ लागले. दुसरीकडे चोर... चोर... च्या घोषणाही वाढल्या. आजतरी राजकारण चौकीदाराभोवतीच फिरताना दिसत आहे.
 
असे असताना, एका नेत्याला अचानक पुन्हा चायवाला आठवला! तो नेता म्हणजे, समाजवादी पार्टीचे राजपुत्र आणि उत्तर प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव. मुलायमिंसगांना नमायला लावून या अखिलेशने सपा ताब्यात घेतली आणि बापाची कट्टर दुष्मन असलेल्या मायावती बुआशी हातमिळवणी करून सपा-बसपा-रालोद असे गठबंधनही जमविले. एवढेच नव्हे, नेताजी आणि बहेनजी यांंना पाव शतकानंतर एका व्यासपीठावर आणण्याचा चमकारही त्यांनी करून दाखविला. विविध पक्षांमधील युवा नेत्यांमध्ये अखिलेश हे सध्या आघाडीचे नाव आहे, हे नाकारता येणार नाही.
 
अखिलेशने परवा एकदमच चायवाला शब्द वापरला. फरूखाबादच्या सभेत ते म्हणाले- पंतप्रधान स्वत:ला चायवाला म्हणवतात, तर आम्ही सुद्धा दूधवाले आहोत म्हटलं! चहासाठी दूध लागतेच ना! हा युवानेता हे विसरला की, बिनदुधाचा चहा पिण्याची जास्त फॅशन आहे! ब्लॅक टी, ग्रीन टी, लेमन टी यांची सध्या चलती आहे. दूध हा चहाचा घटक पूर्वीसारखा राहिलाच नाही. मधुमेहाच्या वाढत्या प्रस्थामुळे साखरही कमी झाली आहे. अखिलेशला कोणी सांगावे हे?
 
महत्त्वाचे म्हणजे, हा दुधाचा मुद्दा का काढला गेला असेल? चायवालाला उत्तर म्हणून ? छे... सरळसरळ जातीचे कार्ड आहे हे! यादव हे उत्तरेतील गवळी आहेत. परंपरेने दुधाचा धंदा करणारे. त्यांचे मतदार हेच सपाचा पाया आहे. त्यासाठी दुधाची उपमा. सपा यादवांची, बसपाचे दलित, रालोद जाटांचे आणि हे सगळे मुस्लिमांच्या मागे, असे उत्तर प्रदेशात उघड जातीय समीकरण आहे. सपाला दूधवाले म्हणत अखिलेशने तेच कार्ड टाकले बघा.
 
विनोद देशमुख 
9850587622