राज ठाकरेंची सभांमधील भाषणे म्हणजे निव्वळ करमणूक- विनोद तावडे
   दिनांक :21-Apr-2019
 
 
 
मुंबई,
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचार सभांना जाणारी लोक केवळ टाईमपास, मनोरंजन व करमणुकीसाठी जातात, असे त्या सभेला जाणारे लोकच सांगतात; पण त्यांच्या पक्षाप्रमाणे आमचा पक्ष टुरिंग टॉकिज पक्ष नाही, आमचा राजकीय पक्ष विचाराने चालतो, असा मार्मिक टोला शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मारला. राज ठाकरे यांच्या मताचा अधिकार सरकार काढते, असा जावईशोध मनसे नेते अभिजीत पानसे यांनी लावल्याबद्दल प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना तावडे म्हणाले की, पानसे यांना बहुधा ‘ठाकरे’ चित्रपटाची स्क्रिप्ट आठवली असेल, पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा मताधिकार काढून घेतला, त्यांनाच मते द्या, असे राज ठाकरे सांगत आहेत, अशी टीकाही तावडे यांनी केली.
 
मनसेकडून विनाकारण खोटेनाटे आरोप पसरवून हौतात्म्य आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण राज ठाकरे यांचे मत पडले तर काही मोठा फरक पडणार नाही. कारण त्यांच्या सभांना जाणारा माणूस टाईमपाससाठी गेलो, असे बोलत असल्याचे स्पष्ट करतानाच, तावडे म्हणाले की, नोटबंदी राज ठाकरे यांना का झोंबली आहे, जे सगळे पैसे बँकेत आले, ते कोणाकोणाच्या नावाने आले, त्याची माहिती त्यांनी घेतली पाहिजे, म्हणजेच जे पैसे बाहेर अनअकाऊंटेड फिरत होते, ते अकाऊंटेड झाले, याचा अर्थ काळा पैसा आला नाही का, यासाठी अर्थकारण समजून घ्यावे लागते आणि ते समजले नाही की, अशी काहीतरी गडबड होते, असा टोलाही त्यांनी मारला.
 

 
ज्या पक्षाने वर्षोनुवर्षे आपल्या सत्तेच्या कारकिर्दीत देशाच्या विकासासाठी काहीच कामे केली नाहीत, त्यांना मते द्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सुमारे ४० टक्के ड्रीम प्रोजेक्टची कामे पूर्ण केली व अजूनही काही प्रोजेक्टची कामे सुरू आहेत, त्या मोदी सरकारला मत देऊ नका, असे म्हणणे म्हणजे राजकीय दिवाळखोरीच आहे, असेही तावडे यांनी सांगितले.