‘पीएम नरेंद्र मोदी’ प्रदर्शित होण्यासाठी विवेक ओबेरॉयचे साईचरणी साकडे
   दिनांक :21-Apr-2019
 
 
 
शिर्डी: अभिनेता विवेक ओबेरॉयची भूमिका असलेल्या ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटावर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित व्हावा यासाठी, सदर चित्रपटाच्या चमूने साईचरणी साकडे घातले. अभिनेता विवेक ओबेरॉय, निर्माते संदीप , मनीष आचार्य यांनी साई दरबारी जाऊन प्रार्थना केली.
ओमंग कुमार दिग्दर्शित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस अगोदर त्यावर निवडणूक आयोगाने बंदी घातली. आता उद्या 22 एप्रिल रोजी या प्रकरणी न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी अभिनेता विवेक ओबेरॉय आणि निर्मात्यांनी शिर्डीच्या साईबाबांना साकडे घातले.
विरोध करणार्‍यांनी आधी आमच्यासोबत चित्रपट पाहावा. आक्षेप घेणारे राहुल गांधी, राज ठाकरे, ऊर्मिला मातोंडकर, विशाल भारद्वाज या सर्वांना हा चित्रपट बघावा, असे आवाहन विवेक ओबेरॉयने केले आहे.
दरम्यान, विवेकला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी ‘मोदी-मोदी’ अशा घोषणा देत चाहते विवेकसोबत सेल्फी घेण्यासाठी धडपड करीत होते.