निवडणूक चिन्हांची चर्चा...
   दिनांक :21-Apr-2019
राजकीय पक्ष आणि निवडणूक व निवडणूकचिन्ह यांचा एक अन्योन्य संबंध असतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सर्वसामान्य जनता व मतदारांच्या संदर्भात राजकीय पक्षाचे निवडणूकचिन्ह म्हणजेच निवडणूक निशाणी हीच त्याची खरी ओळख असते. विशेषत: सार्वत्रिक निवडणुकी आल्या की, सर्वच राजकीय पक्ष-पुढारी आपापल्या पक्ष व उमेदवारांचे निवडणूकचिन्ह मतदारांच्या समोर प्राधान्याने व प्रामुख्याने आणून, आपला पक्ष व उमेदवार यांचा विजय होण्यासाठीच तर धडपडतात.
 
 
 
स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय लोकशाहीचा एक अविभाज्य व प्रमुख भाग म्हणून पहिली सार्वत्रिक निवडणूक 1952 मध्ये झाली व तेव्हापासूनच विविध राजकीय पक्ष व निवडणूक लढविणार्‍या अपक्षांच्या निवडणूकचिन्हांचा इतिहासपण सुरू झाला, हा इतिहास आहे. राजकीय पक्ष व त्यांच्या निवडणूकचिन्हांचा मागोवा घेतल्यास प्रामुख्याने लक्षात येणारी बाब म्हणजे, आपल्याकडील सर्वच राजकीय पक्षांच्या निवडणूकचिन्हांमध्ये वेगवेगळ्या संदर्भात व वेगवेगळ्या कारणाने घडून आलेले बदल.
 
त्यादृष्टीने पाहता, कॉंग्रेस हा भारतीय राजकारणातील सर्वात जुना पक्ष. कॉंग्रेसने स्वातंत्र्योत्तर काळातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत बैलजोडी हे आपल्या पक्षाचे निवडणूकचिन्ह स्वीकारले होते. त्यानंतर कॉंग्रेसने हे चिन्ह बदलून इंदिरा कारकीर्दीच्या पहिल्या टप्प्यात गाय-वासरू हे चिन्ह घेतले. त्यानंतर 1980 मध्ये कॉंग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यावर गाय-वासरू हे निवडणूकचिन्ह गोठविल्याने इंदिरा कॉंग्रेसने ‘हाताचा पंजा’ हे निवडणूकचिन्ह स्वीकारले.
 
ऐतिहासिक संदर्भात सांगायचे झाल्यास, कॉंग्रेसपूर्व काळात हाताचा पंजा हे निवडणूकचिन्ह तत्कालीन फॉर्वर्ड ब्लॉक (रुईकर गटाचे) होते. मात्र, यातील तपशिलवार फरक म्हणजे कॉंग्रेसी निवडणूकचिन्हाचे पंजे एकमेकास चिकटलेली असून फॉरर्वर्ड ब्लॉकच्या हाताच्या पंजात मात्र अंतर होते.
 
इंदिराजींनी आणिबाणी लावल्यानंतर 1977 मध्ये जनता पार्टी सत्तेत आली ती नांगरधारी शेतकरी या निवडणूकचिन्हासह. जनता पार्टीत विलीन झालेल्या भारतीय जनसंघाचे पणती हे चिन्ह गोठविण्यात आले. पुढे जनता पार्टीत फूट पडल्यावर स्थापन झालेल्या भारतीय जनता पार्टीने कमळचिन्हाचा स्वीकार केल्यानंतर नांगरधारी शेतकरी हे चिन्हपण गोठविण्यात आले.
 
परस्पर फाटाफूट व त्यामुळे जुने निवडणुकचिन्ह गोठविले जाऊन नवे चिन्ह स्वीकारण्यापासून देशांतर्गत डावे व साम्यवादी पक्षपण दूर राहिले नाहीत. भारतातील साम्यवाद्यांमध्ये 1964 मध्ये फूट पडल्यानंतर भारतीय साम्यवादी पक्षाने विळा आणि कणीस हे परंपरागत, तर मार्क्सवादी साम्यवादी पक्षाने विळा-हातोडा व एक तारा हे लालरंगी निवडणूकचिन्ह स्वीकारले.
 
निवडणूक आयोगाच्या 1991 च्या निर्णयानुसार राजकीय पक्षांच्या निवडणूक चिन्हांमधून पशू-पक्षी, प्राणी इ. सरसकट वगळले व त्याचा मुख्य फटका हा फॉर्वर्ड ब्लॉक व मिझो नॅशनल फ्रंट या पक्षांना बसला. कारण या दोन्ही पक्षांचे प्रादेशिक पक्ष म्हणून निवडणूकचिन्ह वाघ होते. त्याच दरम्यान बहुजन समाज पक्षामुळे हत्ती हे चिन्ह चर्चिले गेले. त्या वेळी हत्ती हे रिपब्लिकन पक्षाचे निवडणूकचिन्ह होते. मात्र, रिपब्लिकन पक्षात फूट पडल्याने हे चिन्ह राष्ट्रीय स्तरावर गोठविले गेले. याशिवाय काही प्रादेशिक पक्षांची विशेष ओळख त्यांच्या निवडणूकचिन्हांमुळे होते व त्यामध्ये शिवसेना- धनुष्यबाण, समाजवादी- सायकल, द्रमुक- दोन पाने व तृणमूल कॉंग्रेस- तीन पाने या चिन्हांचा समावेश होतो.
 
दत्तात्रेय आंबुलकर
9822847886