आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धा: अजय सिंग "ब" गटात अव्वल
   दिनांक :22-Apr-2019
निंग्बो,
भारतीय वेटलिफ्टर्स अजय सिंग आणि अचिंता शेऊली यांनी येथे सुरू असलेल्या आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेत ब गटात अनुक्रमे पहिले व तिसरे स्थान मिळविले. आशियाई यूथ व ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत कांस्यपदक मिळविणार्‍या अजय सिंगने पुरुषांच्या 81 किग्रॅ वजनगटात एकूण 320 किलो (स्नॅच 142 कि. व क्लीन ॲण्ड जर्क 178 कि.) भार उचलला आणि ब गटात अव्वल स्थान मिळविले. अ गटाची प्रक्रिया झाल्यानंतर मंगळवारी अंतिम फेरी होईल.
 
 
 
राष्ट्रीय विजेत्या अचिंताने 77 किग्रॅ वजनगटात एकूण 297 किलो भार उचलून ब गटात तिसरे स्थान मिळविले. त्याने स्नॅचमध्ये 137 कि. व क्लीन ॲण्ड जर्कमध्ये 77 किलो भार उचलला. या गटात इंडोनेशियाच्या रहमत इर्विन अब्दुल्लाह व व्हिएतनामच्या फाम तुआन अन्ह यांनी पहिल्या दोन क्रमांकावर बाजी मारली. रविवारी भारताची अव्वल वेटलिफ्टर मीराबाई चानूने 49 किग्रॅ वजनगटात वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी बजावली, परंतु तिला पदक जिंकता आले नाही. पुरुषांच्या 67 किग्रॅ वजन ब गटात यूथ ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता जेरेमी लालरिननुंगाने तीन विश्वविक्रम नोंदविले.
 
आतापर्यंत झिली दलाबेहरा ही एकमेव भारतीय पदक विजेती ठरली आहे. ओडीशाच्या झिलीने महिलांच्या 45 किग्रॅ वजनगटात एकूण 162 किलो भार उचलून रौप्यपदक पटकावले.