फॅबियो फोगनिनीला पहिले मास्टर्स जेतेपद
   दिनांक :22-Apr-2019
मॉण्टे कार्लो, 
इटलीच्या फॅबियो फोगनिनीने राफेल नदालवर खळबळजनक विजय नोंदविल्यानंतर अंतिम सामन्यात सर्बियाच्या दुसान लाजोव्हीकवर 6-3, 6-4 अशी मात करून आपले पहिले मास्टर्स विजेतेपद पटकावले. स्नायूंच्या दुखापतीची तमा न बाळगता विजेतेपद पटकावणारा 31 वर्षीय फॅबियो सर्वात तळाचा सीडेड खेळाडू ठरला. फॅबियोला 13 वे सीडिंग होते. 1999 मध्ये गुस्ताव्हो कुएर्टेननंतर सर्वात तळाचा विजेता टेनिसपटू ठरला. 
 
 
रोलॅण्ड गॅरोसवर फ्रेंच ओपन स्पर्धा प्रारंभ होण्याच्या पाच आठवड्यांपूर्वी फॅबियोने मॉण्टे कार्लोच्या लाल मातीवर धमाकेदार प्रदर्शन केले. फॅबियोचे हे नववे एटीपी एकेरीचे विजेतेपद ठरले. फॅबियोच्या चतुरस्त्र खेळाला प्रत्युत्तर देण्यास दुसान लाजोव्हीक असमर्थ ठरला. फॅबियोने अनेक नाहक चुका केल्या व लाजोव्हीकला तिसर्‍या गेममध्ये खेळण्याची संधी निर्माण करून दिली होती, परंतु सर्बियाचा दुसान लाजोव्हीक या संधीचा फायदा उचलू शकला नाही.