IPL 2019 ची फायनल चेपॉकऐवजी होणार ‘या’ स्टेडियमवर
   दिनांक :22-Apr-2019
- १२ मे रोजी होणार आयपीएलचा अंतिम सामना
चेन्नईच्या चेपॉक मैदानावरील तीन प्रेक्षागृहांच्या सुसज्जतेबाबत अद्याप प्रमाणपत्र मिळालेले नसल्याने आयपीएलचा अंतिम सामना हा हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १२ मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना रंगणार आहे. त्या आधी खेळवण्यात येणारे ‘प्ले-ऑफ’ फेरीतील Qualifier 1 सामना हा चेन्नईला खेळवण्यात येईल, तर Eliminator and Qualifier 2 हे दोन सामने विशाखापट्टणम येथे खेवले जातील अशी माहिती देण्यात आली आहे.
 

 
चेपॉकवरील आय, जे आणि के या तीन प्रेक्षागृहांच्या सुसज्जतेबाबत २०१२ पासून अद्यापपर्यंत स्थानिक महापालिकेकडून प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्या पार्श्वभूमीवर हैदराबादच्या मैदानाचाही पर्याय सज्ज ठेवण्यात आला आहे, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पदाधिकाऱ्यांनी आधीच सांगितले होते. इतक्या प्रदीर्घ काळापासून या प्रेक्षागृहांबाबत स्थिती स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे BCCI पदाधिकाऱ्यांनी अन्य पर्यायांची चाचपणी केली होती.
‘सध्या आमची तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनशी बोलणी सुरू आहेत. चेन्नईतच अंतिम सामना व्हावा, यात आमचा आक्षेप नाही. मात्र तीन रिकामे स्टँड ही आमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे आयपीएलच्या प्ले-ऑफ, एलिमिनेटर आणि अंतिम फेरीसाठी आम्ही हैदराबाद आणि बेंगळूरु हे राखीव पर्याय ठेवले आहेत’, असे BCCI कडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र अखेर हा निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.