आशियाई ॲथ्लेटिक्स स्पर्धेत पहिल्या दिवशी भारताला पाच पदके
   दिनांक :22-Apr-2019
- आशियाई ॲथ्लेटिक्स स्पर्धा
दोहा, 
येथे सुरु असलेल्या आशियाई ॲथ्लेटिक्स स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दोन रौप्यपदकांसह पाच पदकांची कमाई केली. भालाफेकपटू अन्नू राणी व 3000 मी. स्टीपलचेस खेळाडू अविनाश साबळे हे दोघे रौप्यपदकाचे मानकरी ठरले.
धावपटू एम.पी. पूवम्मा, 5000 मी. धावपटू पारूल चौधरी व 1 हजार मीटरचा धावपटू गावित मुरली कुमार यांनी प्रत्येकी एक कांस्यपदक मिळविले. पाठीतील स्नायूंच्या दुखापतीमुळे हिमा दासकडून 400 मी. शर्यतीच्या हिटदरम्यान अपेक्षाभंग झाला. असे असले तरी चिंता करण्याची गरज नाही. दुती चंदने स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडत 100 मी. शर्यतीच्या उपांत्य फेरीसाठी आपली पात्रता सिद्ध केली. 

 
 
2017 मध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत कांस्यपदक जिंकणार्‍या 26 वर्षीय अन्नू राणीने 60.22 मीटरची फेक करत रौप्यपदक मिळविले. चीनची लियू हुईहुई (65.83 मी.) सुवर्णपदकाची मानकरी ठरली. अन्नू राणीने स्वतःच्या राष्ट्रीय (62.34 मी.) विक्रमापेक्षा दोन मीटर कमी फेक केली. गत महिन्यात फेडरेशन चषकादरम्यान अन्नू राणीने ही विक्रमी कामगिरी केली व या कामगिरीच्या आधारावर तिने सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात याचस्थळी होणार्‍या विश्व ॲथ्लेटिक्स स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केलेली आहे. शर्मिला कुमारीने (54.48 मी.) सातवे स्थान मिळविले. पुरुषांच्या 3000 मी. स्टीपलचेसमध्ये अविनाश साबळे ने 8 मिनिट 30.19 सेकंद अशी वेळ नोंदवित रौप्यपदक प्राप्त केले. हे त्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील पहिले पदक ठरले.
 
महिलांच्या 5 हजार मीटर शर्यतीत 24 वर्षीय पारूल तिसर्‍या स्थानावर आली. तिने 15 मिनिट 36.03 सेकंद अशी वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदविली. गत महिन्यात पारुलने फेडरेशन चषकात 15 मि. 58.35 सेकंद अशी सर्वोत्तम वेळ नोंदविली होती. संजीवनी जाधव (15ः41.12) चौथ्या क्रमांकावर आली. बहरीनच्याच मुतिली विनफ्रेड यावी (15ः28.87) व बोंटू रिबितूने (15ः29.60) अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक पटकावले.
 
महिलांच्या 400 मीटर शर्यतीत अनुभवी धावपटू 28 वर्षीय पूवम्माने 53.21 सेकंद अशी वेळ नोंदवित तिसरे स्थान मिळविले. पहिल्या दोन क्रमांकावर इलिना मिखिना (कझाकस्तान) व सालवा नासेर (बहरीन) यांनी स्थान मिळविले. गावित मुरलीने पहिल्या दिवशी अखेरचे पदक जिंकले. त्याने पुरुषांच्या 1 हजार मीटर शर्यतीत कांस्यपदक मिळविले. त्याने 28 मिनिट 38.24 सेकंद अशी वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदविली. बहरीनच्या दावित फिकाडू व हसन चानीने अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक मिळविले.
 
पुरुषांच्या 400 मीटर शर्यतीत मुहम्मद अनस व अरोकिया राजीव यांनी अंतिम फेरीसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे. महिलांच्या 400 मी. हर्डल्समध्ये सरिताबेन गायकवाड (58.17 सेकंद) व एम. अर्पिता (58.20 सेकंद) यांनी अंतिम फेरीसाठी पात्रता मिळविली. पुरुषांच्या गटात एम.पी. जबीरनेही पात्रता सिद्ध केली आहे. राष्ट्रीय विक्रमवीर जिन्सन जॉन्सन व मोहम्मद अफसल यांनीसुद्धा पुरुषांच्या 800 मीटरच्या अंतिम फेरीसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे.