कोट्यधीश व्हायचंय?
   दिनांक :22-Apr-2019
प्रत्येकाची कोट्यधीश होण्याची इच्छा असते. दीर्घकालीन अशा नियमित आणि नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या माध्यमातून सर्वसामान्य गुंतवणूकदार हे स्वप्न साकार करू शकतो. पुरेसा वेळ दिल्यास अशा गुंतवणुकींमधून चक्रवाढीचे लाभ मिळू शकतात. रिकरिंग डिपॉझिट(आरडी), पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ), युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन (युलिप्स) आणि म्युच्युअल फंड अशा माध्यमांमध्ये महिन्याला दहा हजार रुपये गुंतवून तुम्ही हे लाभ मिळवू शकता. एक कोटी रुपये निधी जमवण्यासाठी कोणत्या पर्यायात कशी गुंतवणूक करायला हवी याबाबतचं मार्गदर्शन... 
 
 
मुदत ठेवींप्रमाणे रिकरींग डिपॉसिटचा पर्यायही सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये बराच लोकप्रिय आहे. फारसा धोका पत्करायची इच्छा नसलेल्यांसाठी मासिक रिकरिंग डिपॉझिट योजना हा आकर्षक पर्याय ठरतो. बँक िंकवा पोस्ट ऑफिसमध्ये हे खातं उघडता येतं. यावरचे व्याजदर बँकेनुसार वेगळे असतात. सध्या पाच वर्षांच्या आरडीवर साधारण सात टक्के दराने व्याज मिळतं. हा व्याजदर कायम राहील असं गृहित धरलं तर तुम्ही यात महिन्याला दहा हजार रुपये गुंतवून 28 वर्षांमध्ये एक कोटी रुपये जमवू शकता.
 
पीपीएफचे व्याजदर केंद्र सरकार ठरवत असल्याने सगळीकडे समान असतात. पीपीएफचा दर आठ टक्के असल्याचं गृहित धरलं तर प्रत्येक महिन्याच्या सुरूवातीला पीपीएफ खात्यात दहा हजार रुपये गुंतवून तुम्ही 26 वर्षांमध्ये एक कोटी रुपये उभे करू शकता. प्रत्येक आर्थिक वर्षात पीपीएफमध्ये दीड लाख रुपयांची रक्कम गुंतवता येते.
 
युलिप्स या विमा योजना असून त्याचा हप्ता शेअर बाजारात गुंतवला जातो. विमा कंपन्या तसंच काही असेट मॅनेजमेंट कंपन्या युलिप्स उपलब्ध करून देतात. या पर्यायात मासिक दहा हजार रुपये गुंतवून 23 वर्षांमध्ये एक कोटी रुपये जमवू शकता.
दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी इक्विटी म्युच्युअल फंडाचा पर्याय योग्य ठरतो. या फंडांमधली दीर्घकालीन गुंतवणूक लाभदायक ठरू शकते. म्युच्युअल फंडांवर बारा टक्के दराने व्याज मिळेल असं गृहित धरलं तर यात प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये गुंतवून 21 वर्षांमध्ये एक कोटी रुपये निधी जमा होईल.