९ वर्षानंतर कतरिना- अक्षय एकत्र
   दिनांक :22-Apr-2019
रोहित शेट्टीने त्याच्या आगामी ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचे नाव जाहीर केले. तसेच चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचेही सांगितले. अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी पहिल्यांदा एकत्र काम करणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता आहे. तसेच अक्षय कुमारसह कोणती अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार याची सर्वत्र चर्चा सुरू होती.
 

 
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटात अभिनेत्री कतरिना कैफ झळकणार असल्याचे ट्विटरद्वारे सांगितले आहे. चाहत्यांसाठी हा एक सुखद धक्काच असणार आहे. अक्षय कुमार आणि कतरिना बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. त्यांची ऑनस्क्रिन केमेस्ट्री पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत. या आधी कतरिना आणि अक्षय ‘ब्ल्यू’, ‘दे दणा दण’, ‘नमस्ते लंडन’, ‘हमको दिवाना कर गये’, ‘तीस मार खान’ या चित्रपटात एकत्र दिसले होते.
 
 
‘सूर्यवंशी’ चित्रपटाचे गेल्या महिन्यात दोन पोस्टर प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटात अक्षय कुमारसह अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि पुजा हेगडे या दोन अभिनेत्री झळकणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. परंतु आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. ‘सुर्यवंशी’ चित्रपटाच्या इंग्लिश नावामध्ये ‘U’ च्या ऐवजी दोनवेळा ‘O’ वापरण्यात आला आहे. त्यामुळे सध्या या नावाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी पुन्हा एकदा अॅक्शन सीनचा भरणा असलेला चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘सिम्बा’प्रमाणेच हा चित्रपटही पोलिसांवर आधारित असणार आहे.