श्रीलंकेच्या समुद्र सीमेवर भारताचे डॉर्नियर विमान, जहाजे तैनात
   दिनांक :22-Apr-2019
- तटरक्षक दल हाय अलर्टवर
श्रीलंका रविवारी आठ शक्तिशाली बॉम्ब स्फोटांनी हादरल्यानंतर भारतीय तटरक्षक दलाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून श्रीलंकेला लागून असलेल्या समुद्र सीमेवर गस्त वाढवण्यात आली आहे. श्रीलंकेत बॉम्ब स्फोट घडवून आणणारे दहशतवादी समुद्र मार्गाने देशाबाहेर पळून जाऊ शकतात. त्यांना निसटून जाता येऊ नये यासाठी भारतीय तटरक्षक दलाने डॉर्नियर टेहळणी विमान आणि जहाजांची तैनाती केली आहे. तटरक्षक दलाच्या सूत्रांनी ही माहिती दिली. मुंबईत २६/११ सारख्या दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तटरक्षक अतिरिक्त खबरदारी घेत आहे. मुंबईवर २६/११ हल्ला करणारे दहशतवादी समुद्र मार्गाने मुंबईत घुसले होते.

 
 
या संघटनेवर संशय
श्रीलंकेमध्ये साखळी बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणणाऱ्या दहशतवादी संघटनेची ओळख पटली असून तौहीद जमात या स्थानिक दहशतवादी गटावर संशय आहे. ईस्टर संडेला घडवून आणलेल्या या बॉम्बस्फोटांमध्ये २९० निष्पाप नागरीकांचा मृत्यू झाला. ५०० जण जखमी झाले. श्रीलंकेच्या इतिहासातील हा भीषण दहशतवादी हल्ला आहे.
स्फोटामध्ये सहभागी असलेले सर्व आत्मघातकी हल्लेखोर श्रीलंकन नागरीक होते अशी माहिती सरकारचे प्रवक्ते आणि श्रीलंकेचे आरोग्य मंत्री रंजिता सेनारत्ने यांनी दिली. राष्ट्रीय गुप्तचर प्रमुखांनी आयजीपीना ११ एप्रिलपूर्वी हल्ला होऊ शकतो असा अलर्ट दिला होता असे सेनारत्ने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.