जिल्ह्यात १०.७५ टक्केच पाणी शिल्लक
   दिनांक :22-Apr-2019
 
 
 वर्धा: जिल्ह्यात मोठे, मध्यम व लघु असे ११ प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पात केवक १०.७५ टक्केच पाणी एप्रिलच्या मध्यत शिल्लक असल्याने मे मध्ये पाण्यासाठी काय हाल होतील, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. वर्धा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महाकली येथील धाम प्रकल्पाचे तळ दिसू लागले आहे.
 

 
 
 
गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने दिवसेंदिवस भूगर्भातील पाण्याची पातळी खोल जाऊ लागली. गेल्या दोन वर्षात तर जमिनीतील पाणी कमी होत गेल्याने प्रत्येकाला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या वर्षी पाऊस कमी झाल्याने उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यामुळे जिल्ह्यात बोअरवेल करण्याचा सपाटा सुरू झाला. ज्या भागात २५ ते ३० फुटावर पाणी लागत होते त्या ठिकाणी आता २५० ते ३५० फूट बोअर करावे लागत आहे. त्यातही अनेकांकडे सुरुवातीला १५-२० फुटावर पाणी लागले त्यानंतर फक्त ओलावाच राहिला आहे. शहरात आठवड्यातुन एकदाच पाणी पुरवठा होत असल्याने पाण्यासाठी ओरड सुरू आहे. अनेकांनी पिण्यासाठी कॅनचा आधार घेतला असून इतर वापरासाठी ८०० रुपये प्रति ट्रँकर पाणी विकत घेणे सुरू केले आहे.
शहरात जूनपर्यंत पाणी पुरेल असे नियोजन करण्यात आले असल्याचे सांगितले जात असले तरी ७ जूनला येणारा पाऊस लांबल्यास पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात धाम नदीतून पाणी पुरवठा केला जातो त्याशिवाय पर्यायी व्यवस्था नसल्याने जून महिन्यात पाणी कसे मिळेल असा प्रश्न सर्वांनाच सतावतो आहे. जिल्ह्यातील महत्वाच्या प्रकल्पात ही मोजकेच पाणी शिल्लक आहे. बोर प्रकल्पात १४.१३ टक्के, निम्मं वर्धा ७.७६, धाम १२.२८, पोथरा २.३२, डोंगरगाव २४.८१, लाल नाला २९.८५ तर वर्धा कार नदी प्रकल्पात २० टक्के पाणी शिल्लक असून पंचदारा, मदन आणि मदन उन्नई धरण कोरडे झाले आहे. नगर पालिकेने पाणी पुरवठा करण्यासाठी २ ट्रँकर विकत घेतले असले तरी या दोन ट्रँकर च्या भरवशावर शहराची तहान कशी भागेल हाही तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे.
जंगलातील पाणवठे आटल्याने वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाल्याने जंगला नजीकच्या भागात वन्य प्राण्यांचे जनावरावलील हल्ले वाढले आहेत.