राफेल म्हणजे राहुल फेल- जावडेकर
   दिनांक :22-Apr-2019
 
 
 
मुंबई : राफेल करारावरून सातत्याने भाजपवर टीका करणाऱ्या राहुल गांधींवर केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी चांगलेच तोंडसुख घेतले आहे. राफेल विमान खरेदीबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितल्यामुळे काँग्रेस पक्ष व त्याचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा खोटारडेपणा सिद्ध झाला आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी मुंबईत व्यक्त केली. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
प्रकाश जावडेकर म्हणाले की, राफेलबाबतच्या फेरविचार याचिकेवर सुनावणी घेण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने दर्शविल्यानंतर राहुल गांधी यांनी सांगितले की, राफेलबाबत चोरी झाली आहे व चौकीदार चोर आहे हे न्यायालयानेही मान्य केले. त्याबाबत अवमान याचिका दाखल झाल्यावर न्यायालयाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली. अखेर राहुल गांधी यांनी माफी मागितली. काँग्रेस म्हणजे खोटारडेपणा आणि राफेल म्हणजे राहुल फेल हे या निमित्ताने दिसून आले असे जावडेकर म्हणाले.