पवारांनीच माझे बोट धरले आहे : राज ठाकरे

    दिनांक :22-Apr-2019
 
 
 
मुंबई: मी नाही, तर शरद पवार यांनीच माझे बोट धरले आहे, असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे बोलत होते. पुणे येथील एका कार्यक्रमात राज ठाकरेंनी राकॉं प्रमुख शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी, राज ठाकरे यांनी पवारांचा हात धरलेलेले छायाचित्र चांगलेच व्हायरल झाले होते. यावरूनच राज ठाकरे हे पवारांसोबत एकत्र येतील, अशा चर्चा रंगल्या होत्या. याचा दाखला देत राज ठाकरे यांना सदर प्रश्न या मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. यावेळी राज ठाकरे म्हणाले, तुम्ही जर हे छायाचित्र नीट बघितले तर, तुमच्या लक्षात येईल की, मी नव्हे तर, पवारांनीच माझे बोट धरले आहे!
 

 
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मोदींविरोधी भूमिकेमुळे आणि शरद पवार यांच्याशी वाढलेल्या जवळीकीमुळे त्यांची राष्ट्रवादीशी युती होईल का, असा प्रश्न विचारला असता, राज ठाकरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील जाहीर भाषणांमधून पवारांचे बोट धरूनच मी राजकारणात आल्याचे सांगतात. याचा अर्थ राष्ट्रवादी आणि भाजपाची आघाडी होणार, असे थोडीच आहे. राजकारणापलिकडेही संबंध असतात. एकमेकांकडे येणे-जाणे असतेच. याचा अर्थ आघाडी किंवा युती, असा नाही. त्यामुळे सध्या तरी माझा भर हा लोकसभा निवडणुकांवर आहे. विधानसभा निवडणुकांवेळी मी माझी भूमिका स्पष्ट करेल. दरम्यान, या मुलाखतीवेळी आपले शरद पवारांशी कुठलेही राजकीय नाते नसल्याचेही ते म्हणाले.