शेअर बाजार ४९५ अंकांनी गडगडला

    दिनांक :22-Apr-2019
 
 
 मुंबई: इराणकडून होणार्‍या कच्च्या तेलाच्या आयातीवरील सवलत अमेरिका उठविणार असल्याच्या वृत्ताने मुंबई शेअर बाजारात आज सोमवारी जणू भूकंप आला. यामुळे भयभीत झालेल्या गुंतवणूकदारांनी नफा कमावण्यावर भर दिल्याने मुंबई शेअर बाजार ४९५ अंकांनी, तर राष्ट्रीय बाजार १५८ अंकांनी गडगडला.
 

 
 
आंतरराष्ट्रीय बाजारांमधील अस्थिरतेचे सावट भारतात दिसून आले. त्यातच विनिमय बाजारात भारतीय रुपयामध्येही मोठी घसरण पाहायला मिळाली. त्याचे पडसादही उमटले. आज सकाळपासूनच दोन्ही शेअर बाजारांमध्ये घसरण सुरू झाली होती. मुंबई शेअर बाजार सकाळच्या पहिल्या तासातच १५० अंकांनी खाली आला होता. त्यानंतर यात सातत्याने घसरण होत गेली. गुंतवणूकदारांनी अनेक बड्या कंपन्यांचे शेअर्स विक्रीला काढले. बहुतेक सर्वच काऊंटर्सवर शेअर्सच्या विक्रीचे सत्र सुरू होते.
मुंबई शेअर बाजारात दिवसभरानंतरच्या उलाढालीनंतर निर्देशांकात ४९५.१० अंकांची घसरण झाली. सायंकाळी बाजार बंद झाला, त्यावेळी निर्देशांक  ३८,६४५.१८ या स्तरावर स्थिरावला होता.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही दिवसअखेर १५८.३५ अंकांची घसरण नमूद झाली. सायंकाळी हा बाजार ११,५९४.४५ या स्तरावर बंद झाला.