श्रीलंका पोलिसांना तपासणी दरम्यान सापडले ८७ बॉम्ब डिटोनेटर
   दिनांक :22-Apr-2019
कोलंबो,
श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये काल साखळी बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणण्यात आली. श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोमध्ये ईस्टर संडे निमित्ताने लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अशातच वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आलेे होते. त्यानंतर आता कोलंबोच्या मुख्य बस स्टँडवर पोलिसांना तपासणी दरम्यान ८७ बॉम्ब डिटोनेटर सापडले असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
 
 
श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोमध्ये ३ चर्च व प्रवाशांची वर्दळ असलेल्या ३ हॉटेल्समध्ये काल बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आलेे होते. त्यानंतर अजून २ ठिकाणी आत्मघाती बॉमस्फोट करण्यात आले होते. या बॉम्बस्फोटांच्या मालिकेमध्ये आतापर्यंत २९० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर ५०० हून अधिक लोक या बॉम्बस्फोट मालिकेमध्ये जखमी झाले आहेत. त्यानंतर आता कोलंबोच्या मुख्य बस स्टँडवर ८७ बॉम्ब डिटोनेटर सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. काल झालेल्या बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच सोशल माध्यमे देखील काही काळ बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.