25 व्या वर्षी सिप सुरू करा
   दिनांक :22-Apr-2019
टाईम इज मनी. डोण्ट वेस्ट टाईम. डोण्ट वेस्ट मनी. स्टार्ट अर्ली. पैसे वाल्यांनो, मुली/मुलाच्या बारशालाच मुली/मुलांना नॉमिनी करून सिप प्रारंभ करा. मध्यम वर्गातील युवकांनो/युवतींनो पहिल्या पगारातूनच 25 व्या वर्षीच सिप प्रारंभ करा. 35 वर्षांचे सिप (प्रतिमाह 10,000 रु.) 1) 12 टक्क्यांनी वाढ झाली तर 5 कोटी 80 लाख देईल 2) 13%नी 7 कोटी 41 लाख रु. मिळतील 3) 14% नी 9.48 कोटी रु. लाभ होईल. 4) 15% नी 12.16 कोटी रु. 5) 16% नी 15.60 कोटी रु. 6) 17% नी 20.02 कोटी रु. 7) 18% नी 25.72 कोटी रु. 8) 19% नी 33.04 कोटी रु. मिळतील 9) 20% वाढीने 42.45 कोटी रु. 35 वर्षांनी मिळतील.
(पाच वर्षांचा उशीर, सिप रक्कम दुप्पट) 
 
 
गत 20 वर्षांमध्ये म्यु. फंड इक्विटी फंडांनी सरासरीने 16% ते 20% लाभ म्हणजे परतावा दिला आहे. हे सर्व विसरून आपण 12 टक्क्यांचे रिटर्न्स गृहीत धरून गणित मांडूया. स्मार्ट युवतींनी/युवकांनी वयाच्या 25 व्या वर्षी 35 वर्षांसाठी प्रतीमाह 8620 रुपयांचे सिप प्रारंभ केले. 60व्या वर्षी त्यांना 5 कोटी रु. प्राप्त होतील. स्मार्टनेसमध्ये कमी पडणार्‍या युवक/युवतींनी वयाच्या 30 व्या वर्षी सिप गुंतवणूक प्रारंभ केली तर त्यांना 5 कोटी रु. मिळण्यासठी 15420 रु. प्रती माह गुंतवावे लागतील. याचा अर्थ पाच वर्षे उशीर झाला तर मासिक हप्ता जवळपास दुप्पट होईल. उशिरा जागे झालेल्यांनी समजा 35 व्या वर्षी सिप प्रारंभ केले तर त्यांना 60 व्या वर्षी 5 कोटी रु. प्राप्त होण्यासाठी 27950 रु. प्रतीमाह गुंतवावे लागतील. ढोबळ मानानी 5 वर्षांचा उशीर सिपचा मासिक हप्त दुप्पट करेल. 25 ते 40 वर्षे म्हणजे 15 वर्षे जागृत न झालेल्या स्त्री/पुरुषांना 5 कोटी रु. 60 व्या वर्षी प्राप्त करण्यासाठी प्रतीमाह 51730 रु. गुंतवावे लागतील. हप्त्याची रक्कम जवळपास दुप्पट होते. 5 वर्षे उशीर झाल्यामुळे, हे पुन्हा-पुन्हा नमूद करावेसे वाटते.
 
पेन्शन आता मिळणार नाही
21व्या शतकाच्या प्रथम दशकात पेंशन कायदा बदलला आहे, याची दखल पगारधार्‍यांनी /वेतनभोगी युवक/यवुतींनी घेतलीच पाहिजे. बचत नीट केली नाही, भरपूर गुंतवणूक केली नाही तर म्हातारपणी कसे जगाल? पहिल्या पगारापासून ते शेवटच्या पगारापर्यंत पैसे गुंतवलेच पाहिजे, कारण आता पेंशन मिळणार नाही. विज्ञान-तंत्रज्ञानामुळे आयुष्य वाढत आहे, 60 ते 90 वर्षे जगण्याची योजना बनवा आणि अमलात आणा, ही कळकळीची सूचना!