सलमान खानच्या 'भारत'चा ट्रेलर प्रदर्शित
   दिनांक :22-Apr-2019
बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'भारत'चा ट्रेलर २४ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र हॉलिवूडच्या पावलांवर पाऊल ठेवत 'भारत'च्या निर्मात्यांनी नुकताच काही निवडक प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत ट्रेलर लाँच केला आणि त्यांची मते जाणून घेतली. यापूर्वी शाहरूख खानने त्याच्या घरी मन्नतवर काही प्रसारमाध्यमांना चेन्नई एक्स्प्रेस चित्रपटाचा ट्रेलर दाखवून त्यांची प्रतिक्रिया घेतली होती. परंतु असे करण्याची सलमान खानची पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे.
 
'भारत'च्या ट्रेलरची सुरूवात फ्लॅशबॅकने होते आणि भारत (सलमान खान) सर्कशीत काम करत असतो. जवाहरलाल नेहरूंच्या निधनानंतर देशात बेरोजगारीची समस्या निर्माण होते. त्याच दरम्यान सलमान तेल खाणीत कामाला लागतो आणि तिेथे त्याची ओळख कतरिनाशी होते. सर्वकाही सुरळीत सुरू असताना खाणीत अपघात होतो आणि अपघातातून देखील भारत सुखरुप वाचतो. ट्रेलरमध्ये सलमानचे कतरिनाशी लग्न झालेले पहायला मिळत आहे. थोडक्यात काय तर भारत सिनेमात अॅक्शन, रोमांस व देशभक्ती पहायला मिळणार आहे आणि चार टप्प्यात कथा उलगडण्यात येणार आहे.
 
 
 
'भारत' चित्रपटात देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आत्तापर्यंतची कथा पहायला मिळणार आहे. भारताच्या पूर्वजांनी कुठल्या प्रकारच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले होते आणि आजचा भारत कसा आहे,अशी या चित्रपटाची ढोबळ कथा आहे. या चित्रपटात सलमान खान व कतरीना कैफसोबत जॅकी श्रॉफ, नोरा फतेही, सुनील ग्रोव्हर, तब्बू, दिशा पाटनी असे अनेक कलाकार आहेत. ईदच्या मुहूर्तावर 'भारत' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे.