शरद पवार यांची प्रचाराची भाषा खालच्या पातळीची - विनोद तावडे

    दिनांक :22-Apr-2019
 
मुंबई:  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची निवडणूक प्रचारातील भाषा अतिशय खालच्या पातळीला गेली आहे. जेव्हा पवारांसारखे नेते इतक्या खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करतात, तेव्हा निवडणुकीत त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली दिसत आहे, अशी जोरदार टीका शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली.
शरद पवार यांच्या प्रचाराच्या भाषेबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला आज उत्तर देताना तावडे यांनी सांगितले की, शरद पवार सध्या बुथवरच्या सामान्य कार्यकर्त्यालाही फोन करून माझ्यासाठी हे कर, माझ्यासाठी ते कर, या प्रकारची भाषा वापरत आहेत, याचाच अर्थ सुप्रिया सुळे यांचे बारामतीमध्ये काही खरे नाही. हे बहुधा त्यांना कळले असावे.
 

 
 
शरद पवार यांच्या मुलीचे काय होईल, अजितदादांच्या मुलाचे काय होईल, मुलायमिंसह यांच्या मुलाचे काय होईल, याचा विचार करू नका, तर आपल्या मुलाबाळांचे काय होईल, याचा विचार करा, त्यांच्या भविष्याचा विचार करून लोकांनी मतदान करावे, असे आवाहन करताना, या राजकीय नेत्यांनी आपापल्या मुला-बाळांसाठी भरपूर संपत्ती गोळा करून ठेवली असल्यामुळे आपापल्या मुलांचे भले करायचे असेल, तर नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेतृत्वच निवडून दिले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
राज ठाकरे यांच्या भाषणांचा राजकीय परिणाम निवडणूकीत काहीही होणार नाही. त्यांच्या भाषणातून फक्त सर्वांची चांगली करमणूक होत आहे. लाव रे व्हिडीओ... असे सांगत आता लोक सोशल मीडियावर व्हिडीओ लावत आहेत. राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांना कसे टेम्पो धुणारे म्हटले होते व त्यांची नक्कल केली होती, छगन भुजबळ यांच्यावर कशी टीका केली होती. शरद पवार यांच्याबद्दल आधी काय भाष्य केले होते, हे सगळे मनसेचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत, याकडेही तावडे यांनी यावेळी लक्ष वेधले.