कारंजा येथील वसुंधरा टीमच्या वतीने एका वर्षात शंभर वृक्षांची लागवड
   दिनांक :22-Apr-2019
 
 
वृक्षसंवर्धनासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती
जागतिक वसुंधरादिन विशेष
 
कारंजा: २२ एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात येते. वृक्षलागवड आणि संवर्धन हे या दिवसाचे विशेष महत्व. याच अनुषंगाने जाणून घेवूया कारंजा येथील वसुंधरा टीमचा वर्षभर्‍याचा प्रवास. कारंजा तालुक्यातील तपोवन येथील दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या निता लांडे या महिलेने २२ एप्रिल २०१८ रोजी वसुंधरा टीमची स्थापना करून वृक्षलागवड व संवर्धनाचे ध्येय गाठण्याचा ध्यास घेतला. याकरिता कारंजा शहरातील तसेच परिसरातील २५ महिलांना आपल्या विचाराने प्रेरित करून वसुंधरा टीमची स्थापना केली. वर्षभर्‍यात वसुंधरा टीमच्या वतीने कारंजा शहरासह ग्रामीण भागात जवळपास १०० वृक्षांची लागवड करून त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी देखील स्विकारली आहे. वसुंधरा टीमचे मुख्य उद्दिष्ट आहे ते म्हणजे सध्यपरिस्थितीत जळत असलेल्या वृक्षांना वाचविणे. या काळात वसुंधरा टीमच्या वतीने कारंजा, कामरगाव मार्गासह कारंजा शेलुबाजार मार्गावरील जवळपास २०० झाडांना आगीतून वाचवून जिवनदान दिले आहे.
 
 
 
 
वृक्ष जळण्याच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी वसुंधरा टीमच्या वतीने कारंजा शहरातील शाळांतील शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती केल्या जात आहे. शिवाय वसुंधरा टीमने वृक्षलागवड व संवर्धन तसेच वृक्ष वाचविणे हेच आपले ध्येय न ठेवता समाजातील गोर गरीब लोकांना आजही अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या मुलभुत सुविधा मिळणे दुरापास्त झाल्यानेे वसुंधरा टीमने कारंजा शहरात कपडा व रोटीबँक स्थापन करून या माध्यमातून गोरगरीबांना कपड्याचे व अन्न पदार्थाचे वाटप करण्यात येते. निता लांडे यांना पर्यावरण मानवता विकास संस्थेचा वृक्षमित्र तसेच पर्यावरण मित्र पुरस्कार मिळाला असून, अभा ग्राहक पंचायतीच्या हिरकणी पुरस्काराने देखील गौरविण्यात आले आहे. इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या निता लांडे यांची आर्थिक परिस्थिती ही बेताची असल्याने गेल्या १० वर्षांपासून संसाराचा गाढा ओढण्यासाठी शिवणकामाचा आधार घेत आहे. सदर कार्य करतांना आर्थिक अडचण निर्माण हेात असल्याने शासनाने या संदर्भात मदत करावी अशी माफक अपेक्षा यावेळी निता लांडे यांनी व्यक्त केली.