१०२ पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह
   दिनांक :23-Apr-2019
 
 
 
गडचिरोली: राज्यात उल्लेखनीय व विशेष कामगिरी करणार्‍या पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना दरवर्षी पोलिस महासंचालकांंचे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येते. यावर्षी नुकत्याच जाहीर झालेल्या यादीत राज्यातील एकूण ८०० पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह घोषित करण्यात आले आहे. त्यामध्ये नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील व दुर्गम अशा गडचिरोली जिल्ह्यातील एकूण १०२ पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांचा समावेश आहे. यात ४ पोलिस अधीक्षक, ३ सहायक पोलिस निरीक्षक, १६ पोलिस उपनिरीक्षक, ७९ पोलिस कर्मचार्‍यांचा समावेश आहे.
 

 
 
यामध्ये तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक व सध्या चंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत असलेले पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक व सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात कार्यरत असलेले पोलिस अधीक्षक राजा रामासामी, सध्या कार्यरत अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गडचिरोली महेंद्र पंडित, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) गडचिरोली डॉ. श्रीहरी बालाजी यांचा समावेश आहे. पुरस्कारप्राप्त सर्व पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.
१०२ अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा पोलिस महासंचालक सन्मानचिन्हाने गौरव होणे ही बाब गडचिरोली पोलिस दलासाठी गौरवास्पद आहे. पुरस्कारप्राप्त अधिकारी व कर्मचार्‍यांचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी अभिनंदन केले आहे.