आशियाई कुस्ती स्पर्धेत बजरंग पुनियाला सुवर्णपदक
   दिनांक :23-Apr-2019
- प्रवीण राणा अंतिम फेरीत
 
झियान,
प्रथम विश्वमानांकित कुस्तीपटू बजरंग पुनियाने लागोपाठ 10 गुण संपादन करत आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाचा मान मिळविला. पुरुषांच्या 65 किग्रॅ वजनगटाच्या फ्री-स्टाईल प्रकारात चुरशीच्या अंतिम सामन्यात बजरंगने कझाकस्तानच्या सायातबेक ओकास्सोव्हवर 12-7 अशा गुणफरकाने मात केली. प्रवीण राणाने पुरुषांच्या फ्री-स्टाईल प्रकारात आपापल्या वजनगटाची अंतिम फेरी गाठली आहे. 
 
 
अंतिम लढतीच्या प्रारंभी राष्ट्रकुल व आशियाड विजेता बजरंग अवघ्या 60 सेकंदात 2-7 ने पिछाडीवर पडला होता, परंतु त्यानंतर बजरंगने तीन आक्रमक चाली खेळत जोरदार मुसंडी मारली आणि आपली गुणसंख्या आठवर पोहोचवली. यादरम्यान, सायातबेक काहीसा थकलेला जाणवला, तर बजरंगने आपल्या ताकद व कौशल्याच्या बळावर विजेतेपद खेचून आणले.
बजरंगचे हे आशियाई कुस्ती स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक असून त्याने यापूर्वी 2017 साली जिंकले होते. या सुवर्णपदकाबरोबरच या स्पर्धेत भारताचे हे पाचवे पदक ठरले. या दमदार प्रदर्शनासोबतच बजरंगने आपणच 2020 टोकियो ऑलिम्पिक पदकाचा प्रबळ दावेदार असल्याचा इशारा आपल्या प्रतिस्पर्ध्यांना दिला आहे.
 
बजरंगने अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासात केवळ एक गुण गमावला. त्याने उपांत्य लढतीत उझबेकिस्तानच्या सिरोजीद्दीन खासानोव्हवर 12-1 अशा गुणफरकाने सहज विजय नोंदविला. यापूर्वीच्या फेरीत त्याने इराणच्या पेयमान बियाबानी व श्रीलंकेच्या चार्लिस फर्नवर विजय नोंदविला. प्रवीण राणानेसुद्धा 79 किग्रॅ वजनगटाची अंतिम फरी गाठली असून उपांत्य लढतीत त्याने कझाकस्तानच्या गल्यामझान उस्सेरबायेव्हवर 3-2 असा विजय नोंदविला. आता सुवर्णपदकासाठी प्रवीणला इराणच्या बहमान मोहम्मद तेयमोऊरीशी दोन हात करावे लागणार आहे. यापूर्वी त्याने जपानच्या युता अबे व मोंगोलियाच्या तुग्ज इर्डिन डेन्झेनशाराव्हवर मात केली होती.
पुरुषांच्या 57 किग्रॅ वजनगटात रवी कुमार कांस्यपदकासाठी झुंजणार आहे. त्याने रेपेचेझ लढतीत तायपेईच्या चिया त्सो लियू याच्यावर मात केली. रवीचा सामना जपानच्या युकी ताकाहाशीसोबत होणार आहे.