उद्धव ठाकरेंंसह चौघांविरुद्ध अटक वॉरंट जारी
   दिनांक :23-Apr-2019
पुसद: सुमारे दोन वर्षांपूर्वी मराठा आरक्षण संदर्भातील महामोर्चांच्या काळात शिवसेनेचे मुखपत्र दैनिक ‘सामना’मध्ये या मोर्चाबाबत अवमानकारक व्यंगचित्र प्रसिद्ध केल्या गेले होते. या संदर्भात पुसद येथील न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या बदनामी प्रकरणात न्या. अनंत बाजड यांनी शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासह चार जणांविरुद्ध अटक वॉरंट बजावले आहेत.
 

 
 
 
मराठा समाजाच्या आरक्षणाकरिता मूक महामोर्चांचे मोठे आंदोलन सुमारे दोन वर्षांपूर्वी करण्यात आले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर २५ सप्टेंबर २०१६ रोजी ‘हसोबा प्रसन्न’ या शीर्षकाखाली ‘अतिविराट मुका मोर्चा’ असे व्यंगचित्र प्रसिद्ध केले होते. त्यामुळे मराठा समाजाची अवमानना झाली.
तसेच भारतीय सैन्य दलातील शहीद सैनिकाच्या बाबतीत ‘तो डेंग्यूच्या हल्ल्यात शहीद झाला, सीमेवर नाही’ असे एका बातमीत संबोधून दै. सामनाने देशद्रोहाचा गुन्हा केला, असा आरोप करून पुसद येथील ॲड. दत्ता भाऊराव सूर्यवंशी यांनी स्वत:च पुसद सत्र न्यायालयात खटला दाखल केला आहे. भारतीय दंडविधान कलम २९२, २९५ (अ), २९६, ५००, ५०१, ५०९ सह कलम १२४ (अ), ३४ नुसार ॲड. सूर्यवंशी यांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अनंत बाजड यांच्या न्यायालयात प्रकरण दाखल केले आहे.
 

हेच ते वादग्रस्त कार्टून  
 (हेच ते वादग्रस्त कार्टून )
 
या प्रकरणात ‘सामना’ दैनिकाचे संपादक व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत, मुद्रक व प्रकाशक राजेंद्र भागवत आणि व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांना आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणात अनेकदा समन्स पाठवूनही हे आरोपी पुसद न्यायालयात हजर झाले नाहीत. त्यामुळे ॲड. दत्ता सूर्यवंशी यांनी २२ एप्रिल १९ रोजी न्यायालयात अर्ज दाखल केला.
न्यायालयात ॲड. सूर्यवंशी यांनी युक्तीवाद करताना, हे आरोपी जाणूनबुजून तारखांवर हजर राहात नाहीत, या सर्वांचा हे प्रकरण लांबवण्याचा उद्देश दिसत असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध वॉरंट बजावण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार न्या. अनंत बाजड यांनी २२ एप्रिल १९ रोजी यापैकी व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई वगळता तिघांविरुद्ध अटक वॉरंट बजावला आहे.
या प्रकरणी उद्धव ठाकरे, संजय राऊत व राजेंद्र भागवत यांच्या वतीने पुसदच्या ॲड. अशोक महामुने, ॲड. वीरेंद्र राजे, ॲड. पवन जैन व ॲड. उमाकांत पापीनवार यांची फौज येत्या तारखेवर उभी राहणार असून ते या आरोपींची बाजू न्यायालयात मांडणार आहेत.