कॉंग्रेसचा प्रचार करणार्‍या पोलिस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल
   दिनांक :23-Apr-2019
मुंबईतील कॉंग्रेस उमेदवार संजय निरुपम यांचा प्रचार करणारे सहायक पोलिस आयुक्त नरिंसह यादव यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 
 
 
यादव हे कुस्तीपटू आहेत आणि निरुपम यांनी यादव यांच्या कुस्तीगीर संघटनेला भरपूर आर्थिक मदत केली आहे. यातही काही आक्षेपार्ह नाही. पण, पदावर असताना, कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करणे हे मोठ्या शिस्तभंगाच्या कारवाईला आमंत्रण देणारे असल्याचे कायद्यात नमूद आहे. संजय निरुपम यांनी यादव नगर भागात आपल्या प्रचारार्थ एका सभेचे आयोजन केले होते. नरिंसह यादव हे उत्तर भारतीय असल्याने त्यांनी नरिंसह यादव यांना पाचारण केले. मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील उत्तर भारतीयांची मते आपल्याकडे खेचण्यासाठी संजय निरुपम यांनी आयोजिलेल्या प्रचार सभेला यादव यांनी हजेरी लावली. एवढेच नव्हे, तर त्यांनी आपल्या भाषणात उत्तर भारतीयांना आवाहन करताना, निरुपम यांनाच मत देण्याचा आग्रह केला. हा निवडणूक नियमांचा भंग तर आहेच, पण सहायक पोलिस आयुक्त नरसिंह यादव यांनी कार्यालयीन शिस्तीचाही भंग केला आहे आणि यासाठी जबर शिक्षा आहे. त्यामुळेच त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध कार्यालयीन चौकशीही करण्यात येणार आहे.
शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे या गंभीर प्रकरणाची तक्रार केली होती. त्यावर तातडीने यादव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यादव यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. पण, एकूणच हे प्रकरण यादव यांच्यावर चांगलेच शेकणार असल्याचे पोलिस वर्तुळात बोलले जात आहे.