श्रीलंकेतील चर्चमधल्या स्फोटाचा संशयीत आरोपी सीसीटीव्हीत कैद
   दिनांक :23-Apr-2019
ईस्टर संडेला श्रीलंकेतील कोलंबो शहरात झालेल्या आठ साखळी स्फोटांपैकी एका चर्चमध्ये झालेल्या स्फोटातील संशयीत आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याचा एका व्हिडिओ समोर आला आहे. हे स्फोट आत्मघाती पथकांद्वारे घडवून आणल्याचा अंदाज तपास पथकांनी व्यक्त केला आहे.
 
 
कोलंबोतल्या सेंट सेबॅस्टिअन चर्चमध्ये स्फोट झाला होता. या स्फोटापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये पाठीवर एक बॅग घेऊन जाणारी व्यक्ती दिसत आहे. ईस्टर संडेनिमित्त या चर्चमध्ये मोठ्या प्रमाणावर ख्रिस्ती लोक प्रार्थनेसाठी जमले होते. चर्च पूर्ण क्षमतेने भरलेले होते. याचाच फायदा घेऊन ही संशयीत व्यक्ती आपल्या पाठीवर एक बॅग घेऊन थेट चर्चमध्ये शिरली. त्यानंतर काही वेळातच इथे शक्तीशाली स्फोट झाला.
 
 
या स्फोटानंतर सर्व होत्याचे नव्हते झाले होते. सीसीटीव्हीत सुस्थितीत दिसत असलेल्या चर्चच्या स्फोटानंतर अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या, संपूर्ण छत कोसळले. हा आत्मघाती हल्ला असल्याचे प्राथमिक तपासातून समोर येत आहे. हा आत्मघाती हल्ला करणारी हीच व्यक्ती असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. श्रीलंकेतील सियाथा टीव्हीने हे सीसीटीव्ही फुटेज प्रसारित केले आहे. या फुटेजच्या हवाल्याने एएनआयने याबाबत ट्वीट केले आहे. श्रीलंकेत झालेल्या आठ साखळी स्फोटांमध्ये सुमारे ३०० पेक्षा जास्त निष्पाप नागरीकांचा मृत्यू झाला आहे. तर ५०० पेक्षा जास्त नागरिक या स्फोटांमध्ये जखमी झाले.