पूर्व विदर्भात येणार उष्णतेची तीव्र लाट
   दिनांक :23-Apr-2019
 
हवामान खात्याचा इशारा
 
भंडारा: पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात मध्यम ते उष्ण लहरी प्रवाहित होण्याचा हवामान खात्याचा अंदाज असून, २४ ते २६ एप्रिलदरम्यान उष्णतेची तीव्र लाट येणार असल्याचा इशारा दिला आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमानाने चाळीशी पार केली असून, तापमानात दोन ते तीन अंश सेल्सियस वाढ होण्याचे संकेत आहे.
अरबीसागर ते बंगालची खाडीपर्यंत गत १० दिवसांत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्यामुळे पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात वादळी वातावरण निर्माण होऊन पावसाच्या सरी कोसळल्या. आता दाब कमी होऊन वार्‍याची गती मंदावली आहे. वातावरणात प्रतिकूल अशा प्रमाणात दाब निर्माण होऊन तापमान वाढण्याचा अंदाज आहे.
 

 
 
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशारानुसार पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात २४ ते २६ एप्रिलदरम्यान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. मध्यम ते उष्ण लहरी प्रवाहित होणार आहे. परिणामी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्याचे सरासरी तापमान ४० अंशाच्या आसपास आहे. या उष्णतेच्या लाटेने त्यात दोन ते तीन अंश सेल्सियस वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजे ४२ ते ४३ अंश सेल्सियस तापमान होण्याची शक्यता आहे. यामुळे जनजीवन प्रभावित होऊन आरोग्याची समस्या निर्माण होते. नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.