वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेमध्ये मराठा आरक्षण नाही- पुन्हा याचिका दाखल
   दिनांक :23-Apr-2019
मुंबई: पुण्यातील काही विद्यार्थ्यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध करत ही याचिका दाखल केली आहे. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठा समाजासाठी राज्य सरकारने शैक्षणिक क्षेत्रात १६ टक्के आरक्षण लागू केले आहे.
मात्र, चालू वर्षी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर प्रवेशप्रक्रियेमध्ये हे आरक्षण लागू करू नये कारण, ही प्रक्रिया मागील वर्षीच सुरू झालेली आहे. त्यामुळे आता तडकाफडकी राज्य सरकार अशाप्रकारे यात मराठा आरक्षण लागू करू शकत नाही. यामुळे इतर विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ शकतो, असा दावा याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आला आहे.
 

 
 
राज्य सरकारने प्रवेशाची पहिली यादी जाहीर केली असून, राज्यभरातून या मुद्यावर अनेक याचिका दाखल झालेल्या असल्या, तरी अद्याप प्रवेश प्रक्रियेवर कोणतीही स्थगिती नाही, असे सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. प्रवेशाची दुसरी यादी येत्या शुक्रवारी म्हणजेच २६ एप्रिलला जाहीर होणार आहे.
त्यामुळे त्यापूर्वी याचिकेवर गुणवत्तेच्या आधारे सुनावणी घेण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाला केली. यावर न्यायालयाने सहमती दिली असून, मंगळवारी ही सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे. नागपूर खंडपीठामध्ये याबाबत तीन याचिका प्रलंबित आहेत, तर मुंबईमध्ये यापूर्वी दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणीस उच्च न्यायालयाने नकार दिला होता.