दहशतवादाचा मानवतेला धोका
   दिनांक :23-Apr-2019
 
 
‘ईस्टर संडे’च्या दिवशी श्रीलंकेची राजधानी कोलंबोत झालेल्या शक्तिशाली अशा आठ बॉम्बस्फोटात 215 जणांचा मृत्यू झाला, तर 500 पेक्षा जास्त लोक जखमी झाले, जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. कोलंबोतील या साखळी बॉम्बस्फोटामुळे काही वर्षांपूर्वी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या घटनांच्या स्मृती ताज्या झाल्या. मुंबईतही असेच एकामागोमाग एक बॉम्स्फोट झाले होते. कोलंबोतही असेच एकामागे एक साखळी बॉम्बस्फोट झाले. दहशतवाद हा मानवतेला असलेला मोठा धोका आहे. कोलंबोतील हे साखळी बॉम्बस्फोट सुनियोजित अशा आंतरराष्ट्रीय षडयंत्राशिवाय होऊच शकत नाहीत, याबद्दल शंका नाही.
 
 
 
 
 
दहशतवादाचे जगासमोरील संकट किती गंभीर आहे, याची प्रचिती बॉम्बस्फोटाच्या अशा घटनांनी येते. येते. आतापर्यंत तरी या बॉम्बस्फोटांची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारली नसली, तरी मुस्लिम कट्टरपंथी संघटना ‘नॅशनल तोहिथ जमात’ या संघटनेने हे बॉम्बस्फोट घडवल्याचा प्राथमिक संशय आहे. आतापर्यंत या संघटनेने नाव फारसे ऐकण्यात आले नव्हते. हे बॉम्बस्फोट कोलंबोतील तीन चर्च आणि तीन पंचतारांकित हॉटेलात घडवण्यात आले, याचाच अर्थ विशिष्ट धर्मीयांना आणि परदेशी नागरिकांना विशेषत: पर्यटकांना लक्ष्य करून हे बॉम्बफोट घडवण्यात आल्याचे दिसते. श्रीलंकेत सिंहली बौद्धांचा तामीळ आणि मुस्लिमांशी सातत्याने संघर्ष होत होता. मात्र या संघर्षात अल्पसंख्यक असलेल्या खिश्चनांचा कधी संबंध आला नव्हता. त्यामुळे यावेळी ठरवून ख्रिश्चन लोकांना का लक्ष्य करण्यात आले, हे चौकशीनंतरच स्पष्ट होऊ शकेल.
या साखळी बॉम्बस्फोटात 33 परदेशी नागरिकही मृत्युमुखी पडले आहेत, यात भारतातील चार जणांचा समावेश आहे. याचाच अर्थ- दहशतवादी संघटना आपल्या उद्दिष्टात सफल झाली, असे म्हणावे लागेल. साखळी बॉम्बस्फोटासाठी श्रीलंकेची निवड का करण्यात आली, हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मुंबईतील बॉम्बस्फोटानंतर जे प्रश्न उपस्थित झाले होते, म्हणजे बॉम्बस्फोटात कोणत्या स्फोटकांचा वापर करण्यात आला, ही स्फोटके कुठून आणि कशी श्रीलंकेत आणण्यात आलीत, तसेच या कटात काही स्थानिक लोकांचा सहभाग होता का, याची उत्तरे चौकशीनंतरच मिळू शकणार आहेत. विशेष म्हणजे- श्रीलंकेचे पोलिस प्रमुख पुजुथ जयसुंदरा यांनी श्रीलंकेत येत्या काळात असे बॉम्बस्फोट होतील, अशी शंका व्यक्त केली होती. याचाच अर्थ- अतिरेकी श्रीलंकेत बॉम्बस्फोट घडवणार, अशी पोलिसांची माहिती होती, मग हे बॉम्बस्फोट रोखण्यासाठी पोलिसांनी कोणते प्रयत्न केले, आणि आपल्या प्रयत्नांनंतरही पोलिस हे साखळी बॉम्बस्फोट का रोखू शकले नाहीत, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. श्रीलंकेला अनेक वर्षे ‘लिट्टे’ या तामिळी बंडखोरांच्या दहशतवादाचा सामना करावा लागला होता. श्रीलंकेतून फुटून निघत वेगळ्या राज्याची लिट्टेची मागणी होती. आपल्या मागणीसाठी लिट्टेने श्रीलंकेत मोठा हिंसाचारही घडवून आणला होता, यामुळे श्रीलंकेत गृहयुद्धाची स्थिती निर्माण झाली होती. 2009 मध्ये ‘लिबरेशन टायगर ऑफ तामीळ इलम’ची वेगळ्या राज्याची समस्या श्रीलंकेने संपुष्टात आणली आणि श्रीलंकेत शांतता निर्माण झाली.
 
जवळपास दशकभराची श्रीलंकेतील ही शांतता रविवारच्या या साखळी बॉम्बस्फोटांनी भंग झाली. श्रीलंकेत काही छोट्यामोठ्या घटना सोडल्या तर शांतता होती, त्यामुळे अचानक श्रीलंकेत झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटांनी सर्वांनाच धक्का बसणे स्वाभाविक आहे. श्रीलंका आणि भारत यांचे वेगळेच भावनिक नाते आहे. श्रीलंका हा बौद्धधर्मीय देश आहे. ‘रावणाची लंका’ म्हणून जिचा उल्लेख केला जातो, ती लंका म्हणजे श्रीलंका असल्याचेही मानले जाते. त्यामुळे श्रीलंकेतील उपद्रवाच्या कोणत्याही घटनेचा भारतावर थेट परिणाम होतो. याआधी श्रीलंकेत लिट्टे तेथील सरकारविरुद्ध लढत असताना त्याची मोठी िंकमत भारताला चुकवावी लागली होती. लिट्टेच्या गृहयुद्धाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत पाठवण्यात आलेल्या शांतीसेनेत भारताचा समावेश होता. राजीव गांधी पंतप्रधान असताना श्रीलंकेच्या दौर्‍यावर गेले होते, त्यावेळी त्यांना मानवंदना देतेवेळी एका श्रीलंकन सैनिकाने त्याच्याजवळ असलेल्या बंदुकीच्या बटाने त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने यातून राजीव गांधी बचावले होते. +
नंतर राजीव गांधी पंतप्रधान नसताना त्यांची हत्या लिट्टेच्या अतिरेक्यांनीच श्रीलंकेतील अशांत परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घडवून आणली होती. त्यामुळे श्रीलंकेत जेव्हा जेव्हा अराजकाची, दहशतवादाची परिस्थिती निर्माण झाली, त्याचा थेट फटका भारताला बसला आहे. त्यामुळे श्रीलंकेतील ताज्या घडामोडींनी भारताने चिंतीत होणे स्वाभाविक म्हणावे लागेल. ‘सभ्य समाजात बॉम्बस्फोटांच्या अशा घटनांना स्थान नसते, हे बॉम्बस्फोट रानटी आहेत,’ अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. बॉम्बस्फोटांच्या या कठीण प्रसंगी भारत सरकार श्रीलंका सरकारच्या पाठीशी असल्याचा निर्वाळाही मोदी यांनी दिला. बॉम्बस्फोटाच्या चौकशीतही सहकार्य करण्याची तयारीही भारताने दर्शवली आहे. श्रीलंकेतील स्फोटांनी भारतातही अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. देशातील चर्च आणि अन्य संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
दहशतवाद ही आता कोणा एका देशाची समस्या राहिली नाही, तर ती जागतिक समस्या झाली आहे. आज जग एवढे छोटे झाले आहे की- जगात कुठेही काही झाले, तरी त्याचा परिणाम एका देशापुरताच मर्यादित राहात नाही. त्यात अनेक देश गुरफटले जातात. त्यामुळे दहशतवादाचा मुकाबला करणे, ही कोणा एका देशाची नाही तर संपूर्ण जगाची जबाबदारी झाली आहे. तसेही जगातील कोणताही एक देश दहशतवादाच्या समस्येचा सामना करू शकत नाही. दहशतवादाने एकाच देशातील नाही तर संपूर्ण जगातील शांतता धोक्यात येत असते. त्यामुळे संपूर्ण जगाने एकत्र येऊन दहशतवादाचा मुकाबला करण्याची गरज आहे. जगातील सर्वच प्रमुख देशांनी श्रीलंकेतील या साखळी बॉम्बस्फोटांचा तीव्र निषेध केला आहे. मात्र आता सर्वच देशांनी फक्त निषेध करून न थांबता दहशतवादाच्या समस्येचा कसा सामना करता येईल, दहशतवादरुपी राक्षसाचा कसा नि:प्पात करता येईल, याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. मात्र दहशतवादाच्या मुद्यावर चीनसारखे काही देश दुटप्पी भूमिका घेत असल्याचे खेदाने म्हणावे लागते. चीननेही आपली दुटप्पी भूमिका सोडून आपल्या भूमिकेचा कोणाला फायदा होतो, वा कोणाचे नुकसान होते, याचा विचार न करता दहशतवादाच्या मुद्यावर व्यापक जागतिक हिताची भूमिका घेतली पाहिजे. जगातील फारच थोडे असे देश असतील, ज्यांना दहशतवादाचा फटका बसला नसेल, त्यामुळे आपल्याला दहशतवादाचा फटका आतापर्यंत बसला नाही, यावर समाधान न मानता तसेच आतापर्यंत बसला नाही म्हणजे पुढेही बसणार नाही, हे गृहित न धरता दहशतवादाच्या मुद्यावर जगातील सर्व देशांनी एकत्र येण्याची गरज आहे.