धमकी देऊन पोलिसांनी मागितली ३० हजारांची लाच
   दिनांक :23-Apr-2019
 
लाचप्रकरणी दोन पोलिसांवर कारवाई
वाळू नेणार्‍यास मागितले 30 हजार
 
अकोला: जिल्ह्यातील दहीहांडा पोलिस स्टेशन हद्दीत अवैध रेतीचे ट्रॅक्टर नेणार्‍या व ते पकडण्याची धमकी देत त्याकडून तीस हजारांची लाच मागणार्‍या दोन पोलिस कर्मचार्‍यांवर मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. या प्रकरणात एक पोलिस कर्मचारी अटकेत असून दुसरा हा निवडणुकीच्या कर्तव्यावर आहे. दरम्यान, या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती एसीबीने दिली आहे.
 

 
 
तक्रारदारास रेती वाहून नेण्यास रोखण्याऐवजी त्यास अवैध रेती वाहतुकीस प्रोत्साहन देत लाच मागण्याचा नवा पायंडा पोलिसांनी पाडला. या प्रकरणात आज लाच स्वीकारताना दहीहांडा पोलिस स्टेशनचे पोलिस नायक दिनेश जगदेव सोळंके यास अटक करण्यात आली आहे. मुख्यालयात नियुक्तीस असलेल्या पोलिस शिपाई मंगेश खेडकर यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला असून तो निवडणुकीच्या कर्तव्यावर आहे.
तक्रारदारास अवैध वाळू वाहतूक केली म्हणून गुन्हा दाखल करून ट्रॅक्टर जप्त करण्याची भीती या पोलिस कर्मचार्‍यांनी दाखवली. तक्रारदारास व त्याचे सहकारी यांना सुमारे चार ते पाच तास थांबवून तीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून अकरा हजार रुपये या पोलिस कर्मचार्‍यांनी स्वीकारले होते. उर्वरित लाचेच्या रकमेसाठी या दोघांनी तक्रारदारास तगादा लावला होता. मंगळवारी बारा हजार रुपये घेताना आरोपीस अटक करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.