अमेरिकेमुळे इराणकडून तेल खरेदी बंद
   दिनांक :23-Apr-2019
इराणकडून तेल खरेदीची सवलत अमेरिकेने बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर परिस्थितीचा सामना करण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत असे भारताकडून मंगळवारी सांगण्यात आले. अमेरिकेने इराणवर निर्बंध लादल्यानंतरही भारतासह काही देशांना इराणकडून तेल खरेदीमध्ये सवलत दिली होती. अमेरिकेने आता ही सवलत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

 
 
या निर्णयामुळे जो परिणाम होऊ शकतो त्याची आम्हाला कल्पना असून आम्ही पूर्णपणे तयार आहोत असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले. मे २०१९ पासून भारतीय रिफायनरींना होणाऱ्या तेल पुरवठयामध्ये कुठलीही कमतरता जाणवू नये. हा तेल पुरवठा सुरळती सुरु रहावा यासाठी भारताकडे मजबूत योजना तयार आहे. जगातील अन्य मोठया तेल उत्पादक देशांकडून अतिरिक्त तेल पुरवठयाचे नियोजन करण्यात आले आहे.
पेट्रोल,डिझेल आणि अन्य पेट्रोलियम उत्पादनांची देशाची गरज भागवण्यासाठी भारतीय रिफायनरी पूर्णपणे सज्ज आहेत असे पेट्रोलियम मंत्रालयाकडून सांगण्यात आले. इराणकडून तेल आयात करणाऱ्या भारत आणि चीन या देशांना निर्बंधातून आणखी सवलत देणार नाही असे ट्रम्प प्रशासनाने सोमवारी जाहीर केले. इराणवर दबाव वाढवण्यासाठी अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे.
तेल निर्यात हा इराणचा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. तेल निर्यात पूर्णपणे बंद करुन इराणची आर्थिक कोंडी करण्याची अमेरिकेची रणनिती आहे. इराणकडून टप्याटप्याने तेल आयात बंद करण्यासाठी भारतासह आठ देशांना नोव्हेंबर २०१८ मध्ये अमेरिकेने निर्बंधातून आठ महिन्यासाठी सवलत दिली होती. चीन, जपान, दक्षिण कोरीया, ग्रीस, टर्की, तैवान, इटली या देशांना अमेरिकेने सवलत दिली होती.