भोपाळ वायुगळती ही शतकातील सर्वात भीषण दुर्घटना : संयुक्त राष्ट्र
   दिनांक :24-Apr-2019
न्यूयॉर्क,
हजारो लोकांना मृत्यूच्या खाईत लोटणाऱ्या 1984 च्या भोपाळ वायुगळतीच्या दुर्घटनेला शतकातील सर्वात भीषण औद्योगिक दुर्घटना म्हणून संयुक्त राष्ट्राच्या अहवालात नोंदवण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्राची कामगार संस्थेने “द सेफ्टी अँड हेल्थ ऍट द हार्ट ऑफ द फ्यूचर वर्क- “बिल्डिंग ऑन 100 इयर्स ऑफ एक्‍स्पीरियन्स’ हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. मध्य प्रदेशच्या राजधानीत युनियन कार्बाइड प्रकल्पात मिथाइल आयसोसायनेट (मिक) गॅसची गळती होऊन 15 हजारांवर लोकांचा मृत्यू झाला होता. विषारी कण अजूनही अस्तित्वात आहेत. हजारो पीडित व त्यांची पुढची पिढी श्वसनासंबंधी आजाराचा सामना करत आहे. वायुगळतीमुळे त्यांच्यातील रोगप्रतिकारशक्तीचे नुुकसान झाले आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
 
 
1919 नंतर भोपाळ वायुगळती ही जगातील सर्वात भीषण वायुगळतीची घटना ठरते. 1919 नंतर इतर नऊ औद्योगिक घटनांमध्ये फुकुशिमा किरणोत्सर्ग तसेच ढाक्‍यातील राणा प्लाझा इमारत कोसळण्याच्या घटनांचाही अहवालात समावेश करण्यात आला आहे.
एप्रिल 1986 मध्ये युक्रेनमध्ये एका वीज केंद्रावर चार अणुसंयंत्रांमध्ये स्फोट झाला होता. त्यातून नागासाकी व हिरोशिमावर करण्यात आलेल्या बॉम्बवर्षावापेक्षा 100 पट जास्त किरणोत्सर्ग झाला होता. स्फोटात 31 जणांचा मृत्यू झाला होता. त्या किरणोत्सर्गाने मात्र हजारो लोक मृत्युमुखी पडले होते. त्याशिवाय एप्रिल 2013 मध्ये ढाक्‍यात राणा प्लाझा इमारत कोसळल्याने 1 हजार 132 जण मृत्युमुखी पडले होते.