पीक पद्धतीत फायदेशीर बदल
   दिनांक :24-Apr-2019
 पीक नियोजन
 
शेती व्यवसायातील विविध समस्यांवर मात करण्यासाठी अनेक देशांमध्ये विमा योजनांचा आधार घेतला जातो. आपल्याकडे मात्र जीवित व्यक्तीचा विमा उतरवणं, त्याला झालेला अपघात किंवा अवेळी होणारा मृत्यू अशा जोखमीवर विम्याच्या सहाय्यानं उपाययोजना या गोष्टींचा आवर्जून विचार केला जातो. ते योग्य असलं तरी शेतीतील पिकांच्या नुकसानीबाबत विम्याचा आधार महत्त्वाचा ठरणार आहे. नाही म्हणायला अलीकडच्या काळात विमा व्यवसायाबाबत प्रचंड जागृती झाल्याने ग्रामीण भागातील अशिक्षितांनासुद्धा विम्याचं महत्त्व पटू लागलं आहे. हेच तत्त्व अनेक देशांनी शेतकर्‍यांना संरक्षण देण्यासाठी, त्यांच्या जोखमीचं व्यवस्थापन करण्यासाठी वापरलं आहे.
 
हे तंत्र 1920 मध्ये सर्वप्रथम जपानने अस्तित्त्वात आणलं. त्यानंतर अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासाारख्या विकसित देशांनी या तंत्राच्या आधारे शेतकर्‍यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेतील शेतकर्‍यांच्या जोखमीचं संरक्षण करण्यासाठी विम्याचे 31 प्रकार निर्माण करण्यात आले आहेत. ब्राझीलसारख्या विकसनशील देशांनीही हा प्रयोग करुन पाहिला. ब्राझीलमध्ये सुरुवातीस हा प्रयत्न अयशस्वी झाला; पण विम्याची पुनर्रचना करुन शेतकर्‍यांना दिलासा देण्याचं काम करण्यात आलं. असं असताना आपल्या शेतकर्‍यांवर अन्याय करण्याचं धोरण का अवलंबलं जातं, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
  
 
अशा परिस्थितीत सरकारवर अवलंबून न राहता शेतकर्‍यांनी त्यांच्या आवाक्यातील कमी खर्चाचे काही प्रयोग करुन पाहण्यास हरकत नाही. निसर्गातील बदलावर स्वत:च्याच तंत्रानं मात करता येणं शक्य आहे. दुर्दैवाने, आपल्याकडे शेतीमालाच्या निर्यातीबाबत फारशी प्रभावी यंत्रणा नसल्यामुळे तसंच शेतकर्‍यांना त्याचा वैयक्तिक अनुभव नसल्यामुळे मर्यादित बाजारपेठेवरच समाधान मानावं लागत आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांनी बदलत्या हवामानात तग धरु शकतील अशी अल्पकाळातील पिकं घेणं आवश्यक आहे. सध्या वापरात असलेल्या ठिबक आणि तुषार िंसचनपद्धती ऐवजी भूमीअंतर्गत सिंचनपद्धतीची ओळख करुन घेणं तसंच त्याचा अभ्यास करणं महत्त्वाचं ठरतं. या नवीन तंत्रामुळे केशाकर्षण पद्धतीने पिकाला आवश्यकतेएवढंच पाणी उपलब्ध होऊन त्याचा अपव्यय टाळला जातो.
 
या पद्धतीमुळे केवळ दहा टक्के पाण्यामध्ये पिके घेणं शक्य होतं. पाण्याचा अल्प प्रमाणात वापर करुन ही पिके घेता येत असल्यानं भारनियमनाच्या काळातही ती जोमदार येतात. उसासारखं जास्त पाणी लागणारं पीक घेण्यापेक्षा एक-दोन वेळा पाणी देऊन अल्प काळात येऊ शकणारी पिके घेणं आवश्यक बनलं आहे. उदाहरणार्थ, केवळ एक महिन्यात येणार्‍या पाणभाज्या, दोन महिन्यात तयार होणारी वाटाण्यासारखी पिके, जनावरांच्या चार्‍यासाठी आणि दुग्ध व्यवसायासाठी लागणारं कडवळ किंवा नेपीयरसारखं दीड-दोन महिन्यात तयार होऊ शकणारं गवत अशी पिकं अल्प काळात चांगलं उत्पादन मिळवून देऊ शकतात. स्टायलो हॅमाटासारखे द्विदल गवत केवळ दविंबदूच्या ओलाव्यावरसुद्धा येऊ शकतं.
 
विदर्भामध्ये संक्रांतीनंतर किंवा उन्हाळ्यात कमी पाण्यातील झाडाझुडपांची शेती करता येणे सहजशक्य आहे. उदाहरणार्थ, चारोळी, औषधी वनस्पतींपैकी गुग्गुळसारख्या वनस्पती यांची लागवड फायदेशीर ठरते. या नवीन पीकपद्धतीचा यशस्वीपणे अंगीकार केल्यास तसेच निर्यातीसाठी प्रयत्न झाल्यास विदर्भातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास हातभार लागू शकेल. विदर्भामध्ये जंगली भागाचे प्राबल्य असल्यामुळे पावसाच्या पाण्यावर किंवा शक्यतो कमी पाण्यात येणार्‍या औषधी वनस्पती उपलब्ध आहेत. जवळपास 47 हजार औषधी वनस्पती, वाळ्यासारख्या सुगंधी वनस्पती यांच्या लागवडीचा वेगळा मार्ग विदर्भातील शेतकर्‍यांनी स्वीकारल्यास आर्थिक अडचणीतून बाहेर येण्यास हातभार लागणार आहे. अशा प्रकारच्या नवीन पिकांच्या लागवडीमुळे दुष्काळ किंवा अतीपावसामुळे आलेल्या संकटाचं रुपांतर अर्थार्जनामध्ये करणं शक्य होईल.