विहीर खचल्याने मलब्याखाली दबून दोघांचा मृत्यू
   दिनांक :24-Apr-2019
एकाला वाचविण्यात यश, म्हसला शेतशिवारातील घटना
  
 
 
कारंजा लाड, तभा प्रतिनिधी  
नवीन बांधकाम सुरू असलेली विहीर खचल्याने मलब्याखाली दबून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कारंजा तालुक्यातील म्हसला शेतशिवारात 24 एप्रिल रोजी सकाळी साडे 8 वाजताच्या दरम्यान घडली. सदर घटनेतील एका जणाला वाचविण्यात यश आले.
प्राप्त माहितीनुसार म्हसला शेतशिवारातील गट नं. 29 मध्ये शेतमालक सुधीर नामदेव थोरात यांच्या मालकीच्या शेतात विहीरीचे बांधकाम सुरू हेाते. त्यावर गोविंद प्रल्हाद करडे, रियाज किफायत खॉ पठाण, गुणवंत मुंडले, जावेद पठाण व सादीक पठाण सर्व रा. कामठा हे मजुर बांधकामाचे काम करीत हेाते. 24 एप्रिल रोजी मजुर कामावर आले असता विहीरीच्या सभोवतालच्या जागेत जेसीबी च्या सहायाने भरती भरण्याचे काम करीत असतांना अचानक विहीरीचा काही भाग खचून खाली पडला. त्यात बांधकाम करणारा ठेकेदार रवी केशव तलवारे (वय 40) रा. कामठा व शेजारी बकर्‍या चारणारा पुंडलिक नारायण धाये (वय 75) रा. म्हसला हे दोघेजण मलब्याखाली दबले तर शेतमालक सुधीर थोरात हे मलब्याखाली दबत असतांना जेसीबी चालकाने त्यांना वाचविले. सदर विहीर ही अंदाजे 30 फुट खोल असून जवळपास 9 फुटापर्यंत विहीरीत पाणी आहे.
 
घटनेची माहिती मिळताच धनज पोलिस स्टेशनचे ठाणेदार शिषिर मानकर, कारंजाचे तहसीलदार रणजीत भोसले, मंडळ अधिकारी देवेंद्र मुकुंद, हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. विहीर खोल असल्याने तसेच विहीरीत पाणी असल्याने बचाव कार्य सुरू करण्यास विलंब झाला. अखेर पोकलँड मशिनच्या सहायाने मलबा हटवून मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी कामरगाव येथील गा्रमीण रूग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान घटनेची पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.