गाजर गवताच्या निर्मूलनासाठी...
   दिनांक :24-Apr-2019
पिकांच्या उत्तम उत्पादनात तणांचा मोठा अडसर असतो. त्यामुळेच वेळच्या वेळी तण नियंत्रणाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तण नियंत्रणाच्या विविध उपाययोजना उपलब्ध असल्या तरी गाजर गवताच्या समूळ उच्चाटनाचं आव्हान कायम आहे. मुख्यत्वे गाजर गवताचे निर्मूलन करण्यासंदर्भात आतापर्यंतचे मानवी आणि रासायनिक तण नाशकांचं प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. तसंच आपल्या देशातील स्थानिक चित्र किडीही गाजर गवताचं नियंत्रण करू शकल्या नाहीत.
 
या सर्व बाबी विचारात घेऊन मेक्सिकन झायगोग्रामा बायकलरॅटा या जातीचे भुंगे जैविक कीड नियंत्रण संचालनालय, बंगळुरू यांच्यामार्फत आपल्या देशात आणण्यात आले. त्यानंतर मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीनं गाजर गवताचे निर्मुलन करण्यासाठी हे भुंगे कसे उपयोगी पडू शकतात, यावर संशोधन केलं. त्याचे अपेक्षित निष्कर्ष समोर आले, ही समाधानाची बाब म्हणायला हवी. 
 
 
मेक्सिकन भुंग्याची मादी पानाच्या खालील बाजूस समुहाने अथवा वेगवेगळी अंडी देते. ही अंडी अवस्था चार ते सहा दिवस असून अंड्यापासून बाहेर आलेल्या अळ्या गाजर गवताची पानं अधाशीपणे खातात. अळ्‌या प्रथम शेवटच्या कळ्या, सहकळ्या आणि नंतर पानाच्या कडा खातात. तरूण अळ्या झाडाची वाढ आणि फुलं येण्याचं थांबवतात. पूर्ण वाढ झालेल्या अळ्या पानांवरून बाजूला सरकून जमिनीवर पडून कोषावस्थेत जातात. यांची कोषावस्था नऊ ते दहा दिवसांची असते. सर्वसाधारणपणे एक मादी भुंगा 2000 अंडी देते. हे भुंगे तीन ते चार महिने जिवंत राहतात.
 
पावसाळ्‌यात जून ते ऑक्टोबरपर्यंत भुंगे शेतात राहतात. तेे नोव्हेंबरपर्यंत जमिनीत सुप्तावस्थेत सात ते आठ महिने दडून बसतात आणि पुढील वर्षाच्या पावसाळ्याच्या सुरूवातीला पावसानंतर निघतात. त्यामुळे शेतात परत भुुंगे सोडण्याची गरज पडत नाही. शक्यतोवर मनुष्य अथवा प्राणीमात्राचा शिरकाव किंवा अडथळा नाही अशा ठिकाणी हे भुंगे गाजर गवतावर सोडणं योग्य असतं. अशा रितीने गाजर गवताचं वेळीच निर्मूलन करता येतं.