या अभिनेत्रीला देण्यात आली दयाबेनच्या भूमिकेची ऑफर
   दिनांक :24-Apr-2019
तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेचे नुकतेच 2700 भाग पूर्ण झाले आहेत. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा आता प्रेक्षकांना त्यांच्यातील एक वाटू लागल्या आहेत आणि त्यातही या मालिकेतील दयाबेन ही भूमिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेमुळे दिशा वाकानीला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

आज प्रेक्षक दिशाला दयाबेन म्हणूनच ओळखतात. दिशा वाकानी गेल्या अनेक महिन्यांपासून मालिकेतून गायब आहे. दिशाने गेल्या वर्षी एका गोंडस मुलीला जन्म दिला. दिशा गरोदर असताना देखील मालिकेचे चित्रीकरण करत होती. पण आता तिची मुलगी लहान असल्याने ती मालिकेपासून गेल्या कित्येक महिन्यांपासून दूर आहे. प्रेक्षकांची लाडकी दयाबेन म्हणजेच दिशा वाकानी मालिकेत केव्हा परतेल याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. पण आता दिशा या मालिकेचा भाग नसून दयाबेन या व्यक्तिरेखेसाठी नव्या कलाकाराचा शोध सुरू असल्याचे या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी नुकतेच सांगितले होते.
दयाच्या भूमिकेसाठी ऑडिशन्स सुरू असून एका अभिनेत्रीला या भूमिकेसाठी मालिकेच्या टीमकडून विचारण्यात देखील आले असल्याचे वृत्त आहे. या वृत्तात म्हटले आहे की, पापडपोल या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या अॅमी त्रिवेदीला दयाच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले आहे.
पण मला या मालिकेबद्दल अद्याप तरी कोणीही विचारले नाही असे तिने सांगितले आहे. तिने म्हटले आहे की, मला या मालिकेसाठी कोणीही विचारलेले नाही. पण ही भूमिका मी साकारावी अशी माझ्या मित्रमैत्रिणींची इच्छा आहे. मला मालिकेबद्दल विचारण्यात आले नसल्याने मी या प्रश्नावर उत्तर देऊ शकत नाही. पण मी एवढेच सांगेन की, दिशा वाकानी दया ही भूमिका गेल्या दहा वर्षांपासून साकारत आहे. त्यामुळे तिला रिप्लेस करणे हे कोणत्याही कलाकारासाठी सोपे नाहीये. दिशाच्या ऐवजी येणाऱ्या अभिनेत्रीला सुरुवातीला प्रेक्षकांचे खडे बोल ऐकावे लागतीलच यात काही शंका नाही.