हरिकाच्या लागवडीविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळेल का?
   दिनांक :24-Apr-2019
 शंका-समाधान
 
अलिकडे हरिक नावाचे तृणधान्यच नामशेष होण्याची वेळ आली आहे. अर्थात काही लोकांच्या प्रयत्नांमुळे अजुनही अल्पशा प्रमाणात का होईना, हे धान्य अस्तित्त्वात आहे. साधारण 30-40 वर्षांपूर्वी लोकांच्या नियमित जेवणात हरिकाचा भात असे. मुख्य अन्न म्हणून प्रामुख्याने त्याचाच वापर जेवणात होत असे. त्यावेळी कोकणात हरिक हे पीक सर्रास घेतलं जाई. कालांतराने तांदळाच्या नवनवीन जाती विकसित झाल्या.
 
त्या लोकप्रिय ठरल्या. त्यामुळे हरिक मागे पडलं. इतकं की, हरिकाचं उत्पादन बंद झालं. पूर्वी जुलै महिन्यात पेरून ऑक्टोबरमध्ये पिकाची कापणी होत असे, अशी शासन दरबारी हरिकाबाबत नोंद आढळते. हरिक हे धान्य तिळासारखं लहान असून त्याचा भात पौष्टीक आणि चविष्ट असतो. तो साबुदाण्यासारखा फुलतो. हरिकाच्या नियमित सेवनानं शरीरातील अतिरिक्त शर्करा कमी होेते. त्यामुळे मधुमेहींना हरिक वरदान आहे. याच्या सेवनानं शरीरातील कोलेेस्ट्रॉलची पातळी कमी होते. त्यामुळे हृदयरोगींनीही हरिकाचं नियमित सेवन करायला हवं. 
 
 
शेवग्याचे औषधी उपयोग कोणते आहेत?
शेवग्याच्या शेंगांचा आहारात अनेक प्रकारे उपयोग केला जातो. शेवग्यामध्ये संत्र्यापेक्षा सात पट अधिक जीवनसत्त्व क, दुधापेक्षा चार पट अधिक कॅल्शियम, गाजरापेक्षा चार पट अधिक जीवनसत्त्व अ, दुधापेक्षा दोनपट अधिक प्रथिनं, केळीपेक्षा तीनपट अधिक पोटॅशियम असतं. तसंच कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, तांबं, आयोडीन, ऑक्झॅलिक ॲसिड, कॅरोटिन, निकाटिनिक अॅसिड, स्कॉर्बिक ॲसिड यांचं प्रमाणही लक्षणीय असतं. वाळलेल्या शेवग्याच्या बियांचं चूर्ण पाणी निर्जंतूक करण्यासाठी वापरलं जातं. बियांपासून निघणारे तेल म्हणजे बेन ऑईल इलेक्ट्रॉनिक्स वस्तूत तसंच घडाळ्यात वंगण म्हणून वापरतात. शेवग्याची मुळं जंतनाशक असतात.
 
याच्या शेंगांपासून बनवलेलेे सूप हृदयरोगावर आणि वजन नियंत्रित करण्यासाठी गुणकारी असतं. शेवग्याच्या सेवनानं पचनक्रियेशी संबंधित आजार नष्ट होतात. दस्त, काविळ या विकारात याच्या पानांचा ताजा रस, एक चमचा मध, नारळ एकत्र करून पिल्यास आराम मिळतो. याच्या पानांचं चूर्ण कॅन्सर आणि हृदय रूग्णांसाठी उपयुक्त आहे. याच्या सेवनानं रक्तदाब नियंत्रित राहतो. याचा रस गर्भवतींना देण्याचा सल्ला दिला जातो. पानांचा उपयोग पोटातील अल्सरच्या उपचारात होतो.