गरज जलसंवर्धनाची
   दिनांक :24-Apr-2019
पीक नियोजन 
 
खरं तर आपल्या देशातील पाणी समस्या निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित आहे, हे लक्षात येईल. त्यादृष्टीने ‘रुफटॉप वॉटर हार्वेस्टिंग’ म्हणजेच छतावर पडणारं पावसाचं पाणी साठवून उपयोगात आणण्याचं तंत्र प्रत्यक्षात आल्यास पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते. अशा पद्धतीनं साठवलेलं पाणी स्वच्छतागृहामध्ये, जनावरांना पिण्यासाठी वा अन्यत्र वापरता येईल. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची बचत होऊ शकते. तसंच हे पाणी जमिनीत मुरवल्यास भूगर्भातील पाण्याची घटणारी पातळी वाढवता येईल. पाण्याचा वाढता वापर आणि त्याचा बेसुमार उपसा यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस बरीच खाली जात आहे. हे लक्षात घेता ‘पाऊस पकडा पाणी साठवा’ यासारख्या योजना उपयुक्त ठरणार आहेत. या पद्धतीत, एक हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या छतावर 600 मिमी.
 
पाऊस पाऊस पडला तर एका मोसमात 50 हजार लिटर एवढं पाणी साठवलं जाऊ शकतं. हे पाणी बोअरमध्ये सोडलं तर भूअंतर्गत पाण्याच्या पातळीत समाधानकारक वाढ होऊ शकते. पाणी साठवण्यासाठीचे पुनर्भरण खड्डे किंवा पुनर्भरण चर तयार करून जतन करण्याची पद्धत वापरली जाऊ शकते. भूजलाची गुणवत्ता वाढवण्यासाठी ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ हे तंत्र या योजनेअंतर्गत गावोगावी राबवायला हवं. हे तंत्र सोपं आहे आणि पद्धतीही सोप्या आहेत. महाराष्ट्र शासनानं शिवकालीन पाणी साठवणूक योजनेद्वारे ‘रेनवॉटर हार्वेस्टींग’ पुनर्जीवित करण्याचे केलेले प्रयत्न महत्त्वाचे ठरले. 
 
 
‘रूफटॉप रेनवॉटर हार्वेस्टींग’च्या दोन पद्धती आहेत. पावसाचं पाणी जमिनीवरील अथवा जमिनीखालच्या टाकीमध्ये साठवणं आणि वापर करणं. दुसरी पद्धत म्हणजे पावसाच्या पाण्याचं जमिनीत पुनर्भरण करुन आवश्यकतेनुसार वापर करणं. वर्षाग्रहण क्षेत्र म्हणजे छप्पर, अंगण याठिकाणी साठलेलं पाणी. ते पाईपद्वारे एकत्र केलं जातं. छतावरील पावसाचं पाणी बर्‍यापैकी स्वच्छ असतं. तथापि त्या पाण्यावर येणारा गाळ, माती आणि तरंगणारे पदार्थ बाजूला काढण्यासाठी फिल्टर वापरला जातो. तर अंगणातील पावसाचं पुनर्भरण करण्यासाठी सेटलमेंट टँक वापरला जातो. यामध्ये पाण्याबरोबर येणारे दगड, माती, विटा आदींचे तुकडे वेगळे केले जाऊ शकतात.
 
त्यानंतर हे पाणी फिल्टरद्वारे गाळलं जातं. पावसाचं पाणी फिल्टरमधून आल्यानंतर साठवलं जातं. यासाठी आरसीसी विटांच्या, दगडांच्या, फेरोक्लिट, पिव्हीसी, एचडीपीई टाक्या वापरता येतात. त्या जमिनीवर अथवा खाली ठेवल्या जातात. बोअर किंवा टाकीमधून पाणी घेऊन समोरील व्हॉल्व्ह बंद करून फिल्टर धुता येतो. धुतलेलं पाणी छताच्या बाजूकडील ‘टी’मधून निघून जातं. ते निर्जंतूक करण्यासाठी टीसीएल पावडर अथवा पोटॅशिअम परमँग्नेट टाकलं जातं. जमिनीखालील उचलपाणी साठ्याचं पुनर्भरण करण्यासाठी पुनर्भरण खड्डा तयार करता येतो. याची रुंदी एक ते दोन मीटर तर खोली दोन ते तीन मीटर असते. यामध्ये दगड-गोटे भरतात. पावसाच्या पाण्याबरोबर गाळ जाऊ नये याची दक्षता घेतली जाते. ठरावीक काळानंतर खड्डा साफ करता येतो. हे तंत्र शंभर चौरस मीटर छत क्षेत्राच्या इमारतीसाठी उपयुक्त आहे. या खड्ड्यावर जाळी बसवली तर अनेक अपघात टळतात.
 
यात जमिनीच्या उताराच्या, काटकोनात अथवा आडव्या दिशेत पुनर्भरण चर बांधले जातात. त्याची रुंदी अर्धा ते एक मीटर, खोली एक ते दीड मीटर आणि लांबी दहा ते वीस मीटर असावी. ही पद्धत 200 ते 300 चौरस मीटर छताचे क्षेत्रफळ असणार्‍या इमारतीला अवलंबता येते. चरामध्ये दगड-गोटे भरले जातात. ठरावीक कालावधीनंतर चर वेळोवेळी साफ करणं गरजेचं असतं. युनोच्या अहवालानुसार, भारतात पाण्याची उपलब्धता कमी होत चालली आहे. यावरून पाण्याच्या क्षेत्रात भारताला किती मोठी मजल मारावी लागणार याची कल्पना येते. भविष्यात शेतीला पाण्याची उपलब्धता कमी होऊन जास्तीत जास्त पाणी शहरीकरण आणि उद्योगाला जाणार आहे. यामुळे शेतकर्‍यांनी आत्ताच जागं होऊन पावसाचं पाणी साठवून जलव्यवस्थापन केल्यास भविष्यात पाण्याच्या टंचाईला तोंड देता येणं शक्य होईल.