'बिग बॉस'चं घर विभागणार दोन भागांत?
   दिनांक :24-Apr-2019
मुंबई,
'बिग बॉस' मराठीच्या दुसऱ्या सिझनचा प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर 'बिग बॉस'ची थीम काय असणार याविषयी चर्चा रंगली होती. या पर्वामध्ये 'बिग बॉस'चे घर दोन भागांत विभागले जाणार आहेत. एका भागात स्पर्धकांसाठी शहरी सुविधा आहेत. तर, एका भागात ग्रामीण जीवन अधोरेखित करण्यात आलं असल्याचं समजतंय.
 
 
हिंदीतील 'बिग बॉस'प्रमाणे मराठी 'बिग बॉस'च्या पहिल्या पर्वाचं चित्रीकरण लोणावळ्यात झालं होतं. मात्र आता चित्रीकरणाची जागा बदलण्यात आली आहे. मुंबईतील गोरेगावमधील फिल्म सिटीमध्ये 'बिग बॉस'चा सेट उभारण्यात आला आहे. 'बिग बॉस'च्या स्पर्धकांना या घरातील या दोन भागांमध्ये विभागण्यात येणार आहे. काही स्पर्धक हे शहरी सुखसुविधा असणाऱ्या भागात राहणार आहेत. तर, काही प्रेक्षक गावाकडच्या भागात राहणार आहेत. गावाकडच्या भागात राहणाऱ्या प्रेक्षकांना त्यांच्या रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झगडावं लागणार असून त्याचे गुणही त्यांना मिळणार आहेत. १२ मेला बिग बॉसचे दुसरे पर्व सुरू होतेय. 'बिग बॉस' हिंदीचं ७वं पर्वदेखील याच थीमवर आधारित होतं आणि प्रेक्षकांचा देखील त्या पर्वाला चांगला प्रतिसाद लाभला होता. आता 'बिग बॉस'च्या या पर्वाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.