9 आत्मघाती हल्लेखोरांमध्ये एक महिलाही
   दिनांक :24-Apr-2019
-श्रीलंकेतील पोलिसांची माहिती
- बहुतांश हल्लेखोर उच्चभ्रू कुटुंबांतील
कोलंबो,
एका महिलेसह 9 आत्मघाती हल्लेखोरांनी श्रीलंकेमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने दिली. या प्रकरणी आतापर्यंत एकूण 60 जणांना अटक करण्यात आली आहे. हल्ल्यात सहभागी झालेले आत्मघाती हल्लेखोर स्थानिक दहशतवादी संघटनेतील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या हल्ल्यामध्ये केवळ नॅशनल तवाहिद जमात (एनटीजे) ही संघटनाच नव्हे, तर तिच्या उपसंघटनाही सहभागी होत्या, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री रुवान विजवर्देना यांनी दिली. हे स्फोट एनटीजेने घडविले आहेत, असे यापूर्वी श्रीलंकेच्या सरकारने स्पष्ट केले होते. वेगवेगळ्या संघटनांमधील हल्लेखोरांनी एनटीजेच्या नेतृत्वात हा हल्ला घडवल्याची माहिती त्यांनी दिली. या हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली असली, तरी हल्ल्यातील सहभागाचे पुरावे मात्र या संघटनेने दिलेले नाहीत. हल्ला घडवणार्‍या विविध दहशतवादी संघटनांचे विदेशी संघटनांसोबत असलेल्या संबंधांचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 
 
9 आत्मघाती हल्लेखोरांपैकी 8 जणांची ओळख पटवण्यात आली आहे, अशी माहिती सीआयडीचे प्रवक्ते रुवान गुणसेकरा यांनी दिली. यातील महिला हल्लेखोर ही एका पुरुष आत्मघाती हल्लेखोराची पत्नी असल्याचे त्यांनी सांगितले. या हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत 60 जणांना अटक करण्यात आली असून, त्यापैकी 32 जणांची कोठडी सीआयडीने घेतली आहे. अटक करण्यात आलेले सर्वच आरोपी श्रीलंकेतील आहेत, असेही त्यांनी सांगितले. रविवारी देशभरात झालेल्या हल्ल्यांतील बहुतांश आत्मघाती हल्लेखोर उच्चभ्रू कुटुंबातील असून, सर्वच उच्चशिक्षित आहेत. त्यांनी विदेशामध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे, असेही विजवर्देना यांनी सांगितले. यापैकी एका हल्लेखोराने ब्रिटनमध्ये शिक्षण घेतले होते. नंतर त्याने श्रीलंकेत येण्यापूर्वी ऑस्ट्रेलियातून पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला, असेही त्यांनी सांगितले.
 
मृतांची संख्या 359
ईस्टर संडेला श्रीलंकेत घडवण्यात आलेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 359 झाली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या हल्ल्यामध्ये 500 पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. हल्ल्यामध्ये 34 विदेशी नागरिकांनाही प्राण गमवावे लागले आहेत. त्यापैकी 10 भारतीय, तीन डेन्मार्क, जपान, नेदलॅण्ड, पोर्तुगाल, बांगलादेश, स्पेन येथील प्रत्येक एक, तर चीन, सौदी अरब, तुर्कस्थान येथील प्रत्येकी दोन नागरिक ठार झाले आहेत. 16 विदेशी नागरिक या हल्ल्यात जखमी झाले आहेत.
 
हल्ल्याची गुप्तचर माहिती नव्हती ः अमेरिका
श्रीलंकेमध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यांची गुप्तचर माहिती अमेरिकेकडे नव्हती, असे अमेरिकेच्या श्रीलंकेतील राजदूत एलिना टेप्लीटेझ यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. भारत आणि अमेरिकेने या हल्ल्यांबाबत सूचना दिली होती, असे यापूर्वी श्रीलंकेतील एका मंत्र्याने सांगितले होते. श्रीलंका सरकारला याबाबत कोणत्या माध्यमातून सूचना मिळाली हे माहीत नाही. मात्र, अमेरिकेला याबाबत कोणतीही माहिती नव्हती, असे त्यांनी मुलाखतीत स्पष्ट केले.