आमदार वडेट्टीवार, धोटे, धानोरकर हाजिर होऽऽऽ!
   दिनांक :24-Apr-2019
चंद्रपूर: मुलींवर अत्याचार झाल्यास पोक्सो कायद्यांतर्गत त्यांना शासनाकडून मदत मिळते म्हणून राजुरा येथील वसतिगृहातल्या आदिवासी मुली आणि त्यांचे पालक अत्याचाराच्या तक्रारी नोंदविण्यासाठी हिरहिरीने पुढे सरसावत आहेत, असे निर्लज्ज वक्तव्य ज्या शाळेच्या वसतिगृहात आदिवासी मुलींवर अत्याचार झाला, त्याच शाळेचे अध्यक्ष तथा काँगे्रसचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुभाष धोटे, विधीमंडळाचे उपगटनेता तथा आमदार विजय वडेट्टीवार, चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचे काँगे्रसचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी केले होते. या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले असून बुधवार, 24 एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या तिन्ही काँगे्रसी नेत्यांना नोटीस बजावला आहे. 30 एप्रिलला आयोगासमोर उभे राहून खुलासा द्या, असा आदेश देण्यात आले आहे.
 
 
 
राजुरा येथील एका खासगी शाळेच्या वसतिगृहात अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणात काँग्रेस नेत्यांनी निर्लज्ज आणि बेताल वक्तव्य केले. त्याची गंभीर दखल राज्य महिला अयोगाने घेतली आहे. या वक्तव्याचा खुलासा सादर करावा, अशा आशयाची नोटीस महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने काँग्रेस नेत्यांना बजावली आहे. तसेच त्यांना व्यक्तीश: हजर राहून खुलासा सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. त्यामुळे हे प्रकरण आता या काँग्रेस नेत्यांच्या चांगलेच अंगलट येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
राजुरा येथील अल्पवयीन मुलींवर झालेले अत्याचार प्रकरण आता राज्यभर गाजत आहे. दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी राज्य महिला आयोगाने 20 एप्रिल रोजी पोलिस अधीक्षक यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे. अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारांच्या तक्रारींची सत्यता पडताळण्याचे काम संबंधित तपास यंत्रणांचे व न्यायपालिका यांचे आहे. त्यांचा तपास पूर्ण होण्यापूर्वीच सुभाष धोटे, विजय वडेट्टीवार व बाळू धानोरकर यांनी, शासकीय मदत मिळविण्याच्या हेतुनेच पीडित मुलींच्या पालकांकडून पोलिसात तक्रारी दाखल केल्या जात आहेत, असे लज्जास्पद वक्तव्य केले. माध्यमांनी ते प्रसारित केले. हे विधान अल्पवयीन आदिवासी मुलींच्या आणि पालकांच्या हेतूवरच संशय घेणारे असून, अतिशय गंभीर स्वरूपाचे आहे. किंबहुना, ही बाब अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची अवहेलना करणारे असल्याचे सकृत दर्शनी दिसत असल्याचेही राज्य महिला आयोगाचे प्रशासकीय अधिकारी अ. शै. सोज्वळ यांनी पाठविलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.