इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही
   दिनांक :24-Apr-2019
-अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण
वॉशिंग्टन,
भारत इराणमध्ये विकसित करीत असलेला धोरणात्मक दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण चाबहार बंदर प्रकल्प हा एक वेगळा अपवाद असून, इराणमधून कच्चे तेल खरेदी करण्याबाबत ट्रम्प प्रशासनाने रद्द केलेल्या आठ देशांच्या सवलतीचा याच्याशी संबंध नाही, असे अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील एका अधिकार्‍याने स्पष्ट केले आहे.
 
 
 
भारत, इराण आणि अफगाणिस्तानच्या मध्य आशियाई देशांसोबतच्या व्यापारासाठी इराणमधील सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांतातील चाबहार बंदर हे सुवर्णसंधी समजली जाते. या बंदरावरील सूत्रे भारताच्या पश्चिमेतील तटवर्ती भागातून हलवणे सहजशक्य असून, चीन विकसित करीत असलेल्या पाकिस्तानमधील ग्वादर बंदराला या स्वरूपातून मोठे आव्हान देण्यात आले आहे. चाबहार बंदर प्रकल्प हा एक वेगळा अपवाद आहे, असे अमेरिकी परराष्ट्र व्यवहार विभागाच्या प्रवक्त्याने वृत्तसंस्थेला सांगितले.
 
हा अपवाद अफगाणिस्तानची फेरबांधणी आणि आर्थिक विकासासाठी आहे आणि यामध्ये चाबहारचा विकास आणि क्रियान्वयन अंतर्भूत आहे. यावर अमेरिकेने नुकत्याच केलेल्या घोषणेचा कोणताही परिणाम होणार नाही, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली. तेल आयातीबाबत आतापर्यंत आठ देशांना दिली गेलेली सवलत मागे घेण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे. त्याचा परिणाम भारताच्या ऊर्जा क्षेत्रावर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहेत.