अंगणवाडी सेविकांना ‘इलेक्शन ड्युटी’ सक्तीची नाही : निवडणूक आयोग
   दिनांक :24-Apr-2019
 
मुंबई: अंगणवाडी सेविकांना इलेक्शन ड्युटी सक्तीची नाही. त्यामुळे निवडणुकीच्या कामासाठी न येणार्‍या अंगणवाडी कर्मचार्‍यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने आज बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केले. न्या. अभय ओक आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली असता, निवडणूक आयोगाने ही बाब स्पष्ट केली. त्याआधी न्यायालयाबाहेर याचिकाकर्त्यांची समजूत काढताना आयोगाच्या वकिलांनी सांगितले की, राष्ट्रसेवेच्या भावनेने अंगणवाडी सेविकांनी हे ऐच्छिक काम करावे. प्रशिक्षणानंतर जर, आता, तुम्ही कामावर येण्यास आयत्यावेळी नकार दिलात तर, कदाचित निवडणुकाच पुढे ढकलाव्या लागतील.
 
 
 
त्यानंतर आयोगाने न्यायालयाला सांगितले की, कर्मचार्‍यांना प्रशिक्षण आणि मतदानाच्या दिवसाचे प्रतिदिन 250 रुपये आणि जेवण किंवा जेवणाचे 150 रुपये भत्ता म्हणून दिले जातील. कल्याण, ठाणे आणि नवी मुंबई येथील 3 हजार 700 अंगणवाडी सेविकांना चौथ्या टप्प्यासाठी इलेक्शन ड्युटीचे प्रशिक्षण दिलेले आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या परिपत्रकामध्ये, विशेष जबाबदारी असलेल्या सरकारी कर्मचार्‍यांना इलेक्शन ड्युटी लावण्यात येऊ नये, असे स्पष्ट केलेले आहे. यामध्ये सीबीआय आणि इतर काही विशेष सेवांसह अंगणवाडी कर्मचार्‍यांचाही समावेश आहे.
अंगणवाडी सेविकांची जबाबदारी ही सेवार्थ आहे. त्यांच्यावर लहान मुलांची तसेच कुपोषित बालकांच्या आहाराची, शिक्षणाची जबाबदारी सोपवलेली आहेे. यात अनेक कामे समाविष्ट असल्याने त्यांच्यावर इतर कोणतीही अतिरिक्त जबाबदारी टाकू नये, असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. निवडणूक आयोगाच्या फेब्रुवारी 2019च्या नियमावलीतही अंगणवाडी कर्मचार्‍यांना निवडणूक ड्युटी लावू नये, असे स्पष्ट म्हटलेले आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच इलेक्शन ड्युटी लावण्यात आल्याचा विरोध करीत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. संघटनेच्या उपाध्यक्ष संगीता चाचले आणि सचिव चेतना सुर्वे यांनी ही याचिका दाखल केली आहे.
घ(वृत्तसंस्था)