खासदार निधी खर्च करण्याचीही समस्या!
   दिनांक :24-Apr-2019
 
 
दरवर्षीच्या अर्थसंकल्पात, लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांना त्यांचा मतदारसंघ वा संबंधित क्षेत्रातील विकास आणि विकासविषयक कामांसाठी खर्चाची तरतूद म्हणून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात येत असली, तरी यापैकी अधिकांश निधी संबंधित खासदारांद्वारे विकासविषयक कामासाठी खर्च करण्यासाठी आपल्या खासदारांना वेळच नसतो, ही एक आश्चर्यकारक वस्तुस्थिती आहे.
परिणामी, कोट्यवधी रुपयांचा मंजूर झालेला सार्वजनिक निधी त्याच्या वापरविना पडून राहतो व देशभरातील मतदार व जनसामान्यांशी निगडित असे रस्ते, आरोग्य, शिक्षण व सार्वजनिक स्वच्छता यासारखे मुद्दे दुर्लक्षित राहतात. ही बाब 15 व्या लोकसभेच्या कार्यकाळात प्रकर्षाने दिसून आली.
 
 

 
 
या संदर्भात विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, सुमारे 8 वर्षांपूर्वी खासदार निधीच्या वार्षिक 2 कोटी रुपयांच्या विकास निधीत 5 कोटी अशी मोठी वाढ करण्यात आली. मात्र, अशाप्रकारे विकास कामासाठी वाढीव निधी मंजूर झाला, पण तो जनतेच्या कल्याणासाठी खर्च करण्यासाठी आपल्या खासदारांना वेळच नसल्याची बाब उघड झाली.
एका सामाजिक कार्यकर्त्याने माहिती अधिकारांतर्गत खासदारांच्या विकास निधीचा वापर कशाप्रकारे केला जातो, या मुद्याचा मागोवा घेऊन पाठपुरावा केला असता असे आढळून आले की, अधिकांश खासदारांना सरकारी खजिन्यातून म्हणजेच सार्वजनिक पैशांद्वारे मिळणारा विकासविषयक निधी त्याच्या वापराविना पडूनच राहतो.
तपशीलवार सांगायचे झाल्यास, आपापल्या क्षेत्र वा मतदारसंघात जनतेच्या विकासविषयक कामांसाठी खासदारांना दरवर्षी 5 कोटी रुपयांचा निधी दिला जातो. मात्र, प्रत्यक्षात लोकसभेच्या 524 खासदारांपैकी केवळ 56 खासदारांनी त्यांना मंजूर करण्यात आलेल्या विकास निधीच्या रकमेपैकी 90%हून अधिक निधी विकासकामावर खर्च केला होता, याची नोंद 2009 ते 2013 या 15 व्या लोकसभेच्या कार्यकाळात करण्यात आली.
तत्कालीन खासदारांपैकी वरील खर्च करणार्‍या खासदारांमध्ये कॉंग्रसचे 21 आणि भाजपाच्या 15 खासदारांचा समावेश होता. या संदर्भात विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, त्या कालावधीत कॉंग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्या विकासनिधीपैकी 78% निधीचा उपयोग केला होता, तर तत्कालीन विरोधी पक्षनेत्या भाजपाच्या सुषमा स्वराज यांनी मात्र बराच अधिक म्हणजेच 93% निधीचा उपयोग विकास कामासाठी केला होता. याउलट तत्कालीन केंद्रीय मंत्री फारुख अब्दुल्ला यांनी 78%, तर समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमिंसह यादव यांनी मात्र 69% विकासनिधीचा उपयोग केल्याचे स्पष्ट झाले आहे.
मात्र, विकासकामाच्या या आघाडीवरपण त्यादरम्यान कॉंग्रसचे त्यावेळचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची कामगिरी तशी निराशाजनकच ठरली. 15 व्या लोकसभेतील ज्या 44 खासदारांनी निम्म्याहून कमी प्रमाणावर खासदार विकास निधीचा उपयोग केला त्यामध्ये राहुल गांधींचा प्रामुख्याने समावेश होता. कारण त्यांनी केवळ 42% विकासनिधीच वापरला होता. या संदर्भात विकासनिधीचा अपुरा वापर करणारे खासदार म्हणून तत्कालीन भाजपा खासदार मेनका गांधी, परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी 42%, माजी क्रिकेटपटू व कॉंग्रेस खासदार मोहंमद अझरुद्दीन 48%, दयानिधी मारन 36%, तर दीपा दासमुन्शी यांनी 46% खासदारनिधीचा केलेला वापर पुरेसा बोलका ठरला होता.
लोककल्याण आणि क्षेत्रीय विकास यांच्या नावावर निवडून येणारे व आपल्या आग्रही बहुमताद्वारे खासदार विकासनिधी वाढवून घेणारे खासदार प्रत्यक्षात या विकासनिधीद्वारा विकासकामे घडवून आणण्यात फारसे स्वारस्य ठेवीत नसतात, हेच खरे!
9822847886